अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरतीत ICDS आयुक्तांकडून आडकाठी?

राज्यात ४ हजार ५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावेत, असे आदेश न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरतीत ICDS आयुक्तांकडून आडकाठी?
IAS Rubal Agarwal

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अंगणवाडी (Anganwadi) कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेली स्थगिती अंशत: उठवली आहे. मात्र राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) आयुक्तांनी मात्र या निर्णयाला आडकाठी लावत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकूणच भरती प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे, असा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे.

राज्यात ४ हजार ५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावेत, असे आदेश न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अगरवाल (Rubal Agarwal) यांनी मात्र नवीन आणि जुन्या निकषानुसार म्हणजेच १० वी उत्तीर्ण किंवा १२ वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीवर बंदी आणली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शुभा शमीम यांनी ‘एज्युवार्ता’शी बोलताना दिली. 

हेही वाचा : शिष्यवृत्ती निकालात या जिल्ह्यांची बाजी; टॉप टेनमध्ये तुमचा जिल्हा आहे का?

शुभा शमीम म्हणाल्या, "कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करत शिक्षण आयुक्तांनी नवीन निकष जारी होण्याआधी रिक्त असलेल्या पदांवर १० वी उत्तीर्ण मदतनीसांची अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती करावी. या विषयी समितीकडून आयुक्तांना पत्रही पाठवण्यात आले आहे.’’ दरम्यान मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.  

अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रतेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने या आक्षेपांचा विचार करून १७ ते  २३ पर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. याप्रकरणी पुन्हा झालेल्या  सुनावणीत आधी दिलेले स्थगिती अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याच्या निर्णयाआधी  मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची जी  पदे रिक्त  होती, ती पदे भरण्यास न्यालयाने  मान्यता देण्यात आली आहे.