अकरापैकी सहा कागदपत्रे द्या अन् शालार्थ आयडी मिळवा!
शालार्थ आयडी मिळविताना पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दमछाक होते. अनेकदा अडवणुक होत असल्याच्या तक्रारी केल्या जातात.
एज्युवार्ता न्युज नेटवर्क
अनुदानासाठी पात्र शिक्षक (Teachers) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने अनुदान उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून (Government) ११ कागदपत्रे निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी सहा कागदपत्रे असली तरी संबंधितांचा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना शालार्थ आयडी (Shalarth News) देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
शालार्थ आयडी मिळविताना पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दमछाक होते. अनेकदा अडवणुक होत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. पण आता सहा कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर कोणीही अडवणूक करू शकणार नाही. किमान सहा कागदपत्रांची पुरावा म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष संबंधित कार्यालयाकडून खात्री करतील. तसेच कार्यालय प्रमुख यांनी प्रमाणित केलेल्या नक्कलाचा उपयोग शालार्थ आयडी देताना केला जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी २० टक्के व ४० टक्के अनुधान घेणाऱ्या शाळांची अटी शर्तीची पुर्तता होत नसल्यास त्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळणार नाही. असे असले तरी त्यांना पुर्वीप्रमाणे अनुदान वितरीत केले जाईल. वैयक्तिक मान्यतेबाबत अनियमितता असल्यास ही मान्यता रद्द केली जाईल. शासन निधीचा विनियोग होत नसल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाकडून निश्चित करण्यात आलेली अकरा कागदपत्रे -
- शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेची पडताळणी करताना वैयक्तिक मान्यता देण्याच्या वर्षाच्या जावक नोंदवह्या उपलब्ध होत नसल्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वर्षाची युडायस प्रपत्रातील माहिती, तद्नंतरच्या वर्षातील नाव नोंद.
- इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा मंडळाशी संलग्नित कामकाजाचे आदेश इ. (नियुक्ती दिनांकपासून).
- नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्ष पूर्ण होण्यापूर्वी करण्यात आलेली बिंदूनामावली मधील कार्यरत कर्मचारी नोंद.
- नियुक्तीच्या दिनांकापासूनचे हजेरीपत्रक, सदरचे हजेरीपत्रक केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या भेटी दरम्यान प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे (किमान तीन वर्षाचे प्रमाणित).
- विविध शासकीय प्रशिक्षणासाठी किमान तीनवेळा पाठवलेले असल्यास सदर प्रशिक्षणाचे प्रशिक्षण आदेश, प्रशिक्षणातील हजेरी पत्रक, उपस्थिती प्रमाणपत्र, कार्यमुक्ती आदेश इ.
- नियुक्ती दिनांकालगतच्या वर्षामध्ये शासकीय कामकाजासाठी नियुक्ती केलेली असल्यास उदा. जनगणना, पशुगणना, निवडणूक कार्यक्रम या शासकीय कामकाजासाठी सेवा अधिग्रहित केल्याबाबतची कागदपत्रे.
- शिक्षक पोर्टलवर करण्यात आलेली नोंद.
- नियुक्तीच्या वर्षापासून वार्षिक निकालपत्रावर शिक्षक, वर्गशिक्षक म्हणून असलेल्या नोंदी.
- नियुक्ती वर्ष किंवा लगत्या वर्षाची तसेच तद्नंतरच्या वर्षाची सेवाजेष्ठता यादी, सदर यादी शासकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेली असावी.
- नियुक्ती शैक्षणिक वर्ष व नंतरच्या शैक्षणिक वर्ष संच मान्यता प्रपत्रातील कार्यरत कर्मचारी प्रमाणित यादी प्रपत्र.
- वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाची आवक शाखेतील नोंद.