HSC Result 2023 : पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा निकालात घट

मंडळामार्फत दि. १८ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशन या शाखांतील एकूण ७० हजार २०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

HSC Result 2023 : पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा निकालात घट
HSC Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC Board) जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा (HSC Supplementary Exam) निकाल सोमवारी (दि. २८) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. परीक्षेचा निकाल ३२.१३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. नियमित परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेतही मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. (HSC Exam Result Update)

मंडळामार्फत दि. १८ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशन या शाखांतील एकूण ७० हजार २०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षा दिलेल्या ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक ५८.५५ टक्के निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

झेडपी शिक्षिका मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

राज्यात सर्वाधित मुंबई विभागातून २८ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विभागाचा निकाल सर्वात कमी २४.८२ टक्के लागला आहे. तर लातूर विभागापाठोपाठ औरंगाबाद विभागाचा ४९.६४, नागपूरचा ३७.६३, नाशिकचा ३६.८१, अमरावती ३२.०२, कोल्हापूर ३०.१५, पुणे २९.३६ आणि कोकण विभागाचा २७.७४ टक्के निकाल लागला आहे.

मुलीच आघाडीवर

ही परीक्षा एकूण २५ हजार ४४९ मुलींनी दिली होती. त्यापैकी ९ हजार २९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ४३ हजार ४६० मुलांपैकी १२ हजार ८५० मुले उत्तीर्ण झाले. मुलींची टक्केवारी ३६.५२ असून मुलांपेक्षा सात टक्क्यांनी अधिक आहे.

वाणिज्य शाखेचा कमी निकाल

शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ५५.२३ टक्के लागला आहे. तर कला शाखेचा २०.५९, वाणिज्य शाखेचा १४.६८, व्यवसाय अभ्यासक्रम १७.८६ आणि आयटीआयचा ८१.२५ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक २६ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती. त्याखालोखाल वाणिज्यची २० हजार ६२४ आणि कला शाखेची २० हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सर्वात कमी निकाल वाणिज्य शाखेचा लागला आहे.    

इथे पहा निकाल – www.mahresult.nic.in

मागील तीन वर्षांचा निकाल

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ – २५.८७ टक्के

जुलै-ऑगस्ट २०२२ – ३२.२७ टक्के

जुलै-ऑगस्ट २०२३ – ३२.१३ टक्के

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo