क्लस्टर युनिव्हर्सिटीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाकडून मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता समूह विद्यापीठे स्थापन होणार आहेत. सक्षम असणाऱ्या शैक्षणिक संस्थांना पदवी प्रदान करता येणार आहे. तसेच पारंपरिक अकृषी विद्यापीठांवरील संलग्न महाविद्यालयांचा भार कमी होणार आहे.

क्लस्टर युनिव्हर्सिटीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाकडून मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Educational Policy) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर समूह विद्यापीठे अर्थात क्लस्टर युनिव्हर्सिटी (Cluster University) स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने (state cabinet) समूह विद्यापीठे स्थापन करण्याच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी (approval of guiding principles) दिले आहे. मात्र, ही मार्गदर्शक तत्वे नेमकी कोणती ?  हे अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतरच समजू शकणार आहे.

हेही वाचा : येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची; विषय निवडण्याचेही स्वातंत्र्य

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने क्लस्टर विद्यापीठासंदर्भातील नियमावली प्रसिद्ध केली होती. त्यावर शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यातील कोणत्या हरकती व सूचनांचा स्वीकार करण्यात आला. हे गुलदस्त्यात आहे .मात्र, राज्य मंत्रिमंडळाने त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांना शुक्रवारी मंजुरी दिली आहे. मात्र, ही मार्गदर्शक तत्वे कोणती याबाबत अद्याप स्पष्टता आलेले नाही. राज्य शासनाकडून अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतरच क्लस्टर विद्यापीठे स्थापन करण्यासाठी काय करावे लागेल? हे समजू शकणार आहे.

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता समूह विद्यापीठे स्थापन होणार आहेत. सक्षम असणाऱ्या शैक्षणिक संस्थांना पदवी प्रदान करता येणार आहे. तसेच पारंपरिक अकृषी विद्यापीठांवरील संलग्न महाविद्यालयांचा भार कमी होणार आहे. क्लस्टर विद्यापीठांमुळे शिक्षणाचे विकेंद्रीकरण होणार असून सक्षम शैक्षणिक संस्थांना स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करणे शक्य होईल. या महाविद्यालयांना अभ्यासक्रम तयार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. महाराष्ट्रात अनेक थोर समाज सुधारकांनी मोठ्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत.या संस्था विद्यापीठ म्हणून पदवी प्रदान करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे शासन निर्णयाचे स्वागत करून अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न करावेत.
----------

उच्च शिक्षण विभागाने पूर्वी  प्रसिध्द केलेली क्लस्टर विद्यापीठांची प्रस्तावित नियमावली खाली दिली आहे : 

१) महाविद्यालयांची संख्या : 

अ. क्लस्टर विद्यापीठासाठी किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच अनुदानित किंवा विनानुदानित महाविद्यालये एकाच व्यवस्थापनाखाली सुरू असावीत. 
ब. एखाद्या संस्थेमध्ये पाचपेक्षा जास्त महाविद्यालये असल्यास राज्य सरकारकडून त्याबाबत प्रत्येक संस्थानिहाय अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल.
२. लीड कॉलेज हे २० वर्षांपासून अस्तित्वात हवे.
३. लीड कॉलेजमध्ये किमान दोन हजार विद्यार्थी प्रवेशित असावेत.
४. क्लस्टर विद्यापीठामध्ये सहभागी होणाऱ्या लीड कॉलेजसह इतर कॉलेजमधील एकूण विद्यार्थी संख्या कमीत कमी  चार हजार हवी.
५. क्लस्टरमधील सर्व कॉलेज लीड कॉलेजपासून २५ किलोमीटरच्या अंतरात असावीत. 
६. अंतराबाबत विशिष्ट परिस्थितीत वाहतूकीची सुविधा उपलब्ध असल्यास त्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाईल.
७. मुंबई महानगरासाठी दोन हेक्टर तर नागपूर, औरंगाबाद,पुणे नाशिक आदी महानगरांसाठी ४ हेक्टर आणि इतर शहरांसाठी ६ हेक्टर जागा असावी.
८. नॅक स्कोअर – लीड कॉलेजचे नॅक रेटिंग ३.२५ हवे.तसेच लीड कॉलेजसाठी ६० टक्के एनबीए अक्रिडिटेशन असावे. 
९. लीड कॉलेजव्यतिरिक्त इतर सहभागी कॉलेजकडे नॅक रेटिंग हवे किंवा किमान ३० टक्के अभ्यासक्रमांना एनबीए अक्रिडिटेशन हवे.
१०. किमान दोन संशोधन केंद्र हवीत . 
११. शैक्षणिक, संशोधन, अध्यापनामध्ये गुणवत्तापूर्ण प्रगती हवी.
१२. शासकीय निधीव्यतिरिक्त इतर माध्यमातून विविध स्त्रोत निर्माण करण्याची क्षमता हवी.
१३. अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांची आवश्यकता.
१४. एनईपी २०२० नुसार भाषिक वैविधता जपण्यासाठी प्रस्तावित क्लस्टर विद्यापीठाने काही अभ्यासक्रम मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये सुरू करणे अपेक्षित आहे.
१५. उद्योग क्षेत्राशी सध्या असलेले विविध भागिदारी करार, विद्यार्थ्यांची इंटर्नशिप आदी माहिती देणे आवश्यक. 
१६. नाविन्यता व संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध पीएचडीचा समावेश हवा.
१७. आयटी सेंटर,स्टार्ट अप सेंटर, इन्क्युबेशन सेंटर आणि त्याअनुषंगाने आवश्यक सुविधा बंधनकारक असतील.