Maharashtra Rain : मुंबई, कोकणात शाळांना सुट्टी; पुण्यातील दुर्गम भागातील शाळा दोन दिवस बंद

हवामान विभागाने (Department of Meteorology) राज्याच्या अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Maharashtra Rain : मुंबई, कोकणात शाळांना सुट्टी; पुण्यातील दुर्गम भागातील शाळा दोन दिवस बंद
Maharashtra Rain Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागांत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणात (Kokan) अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy rain warning) सुरू असून नद्यांना पूर आला असून दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कोकणासह मुंबईत (Mumbai) गुरूवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच पुण्याच्या (Pune) घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असल्याने खबरदारी म्हणून गुरूवारी व शुक्रवारी दोन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हवामान विभागाने (Department of Meteorology) राज्याच्या अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही पावसाची संततधार सुरू असून रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शाळांना गुरूवारी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

परिस्थितीनुसार राज्यातील शाळांना सुट्टी द्यावी ; शिक्षण आयुक्तांचे जिल्हाधिका-यांना पत्र

कोकणात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही दुर्गम भागातील शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे सुरू राहतील, असेही आदेशित करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती पाहून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी पाठवले आहे.