शुल्क भरले नाही म्हणून सुमारे १०० विद्यार्थ्यांना शाळेने ठेवले डांबून

शाळा सुरू होऊन केवळ एक ते दीड महिन्यांचा कालावधी झालेला असताना लोणी काळभोर येथील एंजल शाळेने शुल्कासाठी विद्यार्थी व पालकांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून शाळेतील दुसऱ्या एका वर्गात दाबून ठेवले.

शुल्क भरले नाही म्हणून  सुमारे १०० विद्यार्थ्यांना शाळेने ठेवले डांबून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शुल्क (fee ) भरले नाही म्हणून लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूलने (Angel High School - Loni kalbhor) सुमारे १०० विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलांना शुल्कासाठी शाळेने डांबून ठेवल्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे (Zilla Parishad education department ) संबंधित अधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : शिक्षण RTE अंतर्गत श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश द्या, नाहीतर कारवाई! शिक्षण विभागाकडून दबाव, तीन शाळांचा गंभीर आरोप

खाजगी शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जाते. त्यात विद्यार्थी व पालक भरडले जात आहेत . शाळा सुरू होऊन केवळ एक ते दीड महिन्यांचा कालावधी झालेला असताना लोणी काळभोर येथील एंजल शाळेने शुल्कासाठी विद्यार्थी व पालकांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून शाळेतील दुसऱ्या एका वर्गात दाबून ठेवले. मात्र ही घटना समजल्यानंतर पालकांनी तेथे जाऊन शाळा प्रशासनाला जाब विचारला.तसेच शिवसेनेतर्फे शाळेविरोधात आंदोलन करण्यात आले. 

महत्त्वाची बातमी : राज्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांची सुरक्षा आता महिलांच्या हाती

शिवसेनेचे जिल्हा संघटक निलेश काळभोर म्हणाले, शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना डांबून ठेवणे धक्कादायक आहे. शुल्काबाबत शाळेने पालकांची संवाद साधायला हवा. परंतु,मुलांना डांबून ठेवून पालकांना दूरध्वनीवरून शुल्क भरण्यासाठी दबाव आणला जात होता. विद्यार्थ्यांशी आशा प्रकारचा व्यवहार करण्याची शाळेची ही तिसरी वेळ आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. शाळेने शिक्षण हक्क  कायद्याचे (आरटीई ) उल्लंघन केले आहे. शाळेतील काही व्यक्ती राजकीय नेत्यांची नावे घेऊन आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत पालकांवर दबाव टाकत आहेत. शाळेने मुलांना डांबून ठेवल्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. शिक्षण विभागातील अधिकारीही शाळेला भेट देण्यासाठी आले होते. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
या घटनेबाबत शाळा प्रशासनाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या मुख्याध्यापकांची  संपर्क होऊ शकला नाही.
----------------

"लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल मध्ये घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याबाबत विस्तार अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाईल."

-  संध्या गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

--------

व्हिडिओ पहा : https://www.youtube.com/shorts/w-X3uX0QbkI