मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने कंबर कसली!

सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिकेसंदर्भातील प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम  टप्प्यात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने कंबर कसली!
Minister Chandrakant Patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुढील शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना (Maratha Students) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उपलब्ध व्हावेत, यासाठी वसतिगृहाच्या कामाला जिल्हास्तरावर अधिक गती देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्यांकरिता ‘स्वाधार’ (Swadhar) योजनेच्या धर्तीवर या विद्यार्थ्यांना प्रतिमहा ६ हजार रुपये 10 महिन्यांसाठी  देण्याचा  निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ‘सारथी’मार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पाटील मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सांगितले आहे.

हेही वाचा : नोकरीची सुवर्णसंधी; या वर्षातील दुसरा रोजगार मेळावा बुधवारी, सहभागासाठी अशी करा नोंदणी...

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थाकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती, नियमावली यात एकसूत्रता राहावी या दृष्टीने या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकित प्रकरणांचा व्याज परतावा देऊन संबंधित प्रक्रिया एक आठवड्यात पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिकेसंदर्भातील प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम  टप्प्यात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2