नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात ; तीन दिवसात नोटीस देण्याचे आदेश

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा कुलगुरूंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात ; तीन दिवसात नोटीस देण्याचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी (Implementation of National Education Policy ) राज्यातील सर्व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन (National Assessment and Accreditation Council (NAAC करून घ्यावे ; यासाठी राज्याचा उच्च शिक्षण विभाग ( Department of Higher Education ) आग्रही आहे. आता नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना पुढील तीन दिवसात नोटीस पाठवा, असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी कुलगुरूंच्या बैठकीत मंगळवारी दिले. त्यामुळे नॅक न केलेल्या महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात आली आहे.

हेही वाचा : कंत्राटी भरतीची हौस असेल तर राज्य सरकारच..! भरतीवरून रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. नॅक मूल्यांकन न केल्यास विद्यापीठांना संबंधित महाविद्यालयांची संलग्नता काढून घेता येते. गेल्या काही दिवसांपासून उच्च शिक्षण विभागाकडून एकदाही नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. मंगळवारी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा कुलगुरूंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच अद्याप नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना पुढील तीन दिवसांच्या आत नोटीस पाठवा, असे आदेश यावेळी त्यांनी विद्यापीठांना दिले.

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करताना कोणत्या अडचणी येतात याचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर पर्याय सुचवण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनात जर आर्थिक अडचणी येत असतील तर राज्य शासन त्यावर काही मदत करू शकते का? याबाबतही बच्छाव समिती अहवाल सादर करणार आहे. तसेच नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया अधिक सहज, सुलभ व सोपी व्हावी यासाठी काय करता येऊ शकते, या संदर्भातील अहवाल तयार करण्याची जबाबदारी जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांच्याकडे देण्यात आली आहे. हा अहवाल राज्य शासनातर्फे नॅकला पाठवला जाणार आहे.
---------------------

" राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घेण्यास उच्च शिक्षण विभागाने प्राधान्य दिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यास उच्च शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत कुठेही मागे न जाता जास्तीत जास्त महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन कसे होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरूच राहणार आहेत."

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य