राज्यात ४१८ ‘आयटीआय’मध्ये अभ्यासिका; स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही होणार फायदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अभ्यासिका वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री  मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

राज्यात ४१८ ‘आयटीआय’मध्ये अभ्यासिका; स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही होणार फायदा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) अभ्यासिका सुरू करण्यात आले आहेत. यू. पी. एस. सी. आणि एम. पी. एस. सी. तसेच इतर स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, १०वी आणि १२ वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासिकांचा लाभ घेता येणार आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी अभ्यासिका वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री  मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय  व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावीत यासहप्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने यावेळी उपस्थित होते.

आता मदरशांमध्येही संस्कृतचे धडे; NCERT चा अभ्यासक्रम लागू होणार

 

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. मुले व मुलींकरिता स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील.  यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख  उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j