लॉकडाऊनने दाखवला आशेचा किरण; मुलानेच घेतली आईची शिकवणी, दोघांचीही दहावीत भरारी

मोनिका तेलंगे या हडपसरमध्ये मुलगी व मुलासह राहतात. मुलगी आठवीमध्ये शिकत आहे. तर मुलगा मंथनसोबत त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्याला दहावीत ६४ टक्के गुण मिळाले असून मोनिका यांनी ५१.८ टक्के गुण मिळवले आहेत.

लॉकडाऊनने दाखवला आशेचा किरण; मुलानेच घेतली आईची शिकवणी, दोघांचीही दहावीत भरारी
Manthan Telange with Mother Monika Telange

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोरोना (Covid 19) महामारीमुळे शाळा-महाविद्यालये कुलुपबंद असल्याने अध्ययन-अध्यापवनावर विपरित परिणाम झाला. पण याच लॉकडाऊनने (Corona Lockdown) मोनिका तेलंगे (Monika Telange) यांना आशेचा किरण दाखवला. वीस वर्षांपुर्वी आठवीनंतर शिक्षण सुटल्यानंतर लॉकडाऊनमध्ये मुलांचा घरी अभ्यास घेता-घेता त्यांनाही शिक्षणाची गोडी लागली. मग त्यांनीही मुलासोबतच दहावीची (SSC Result) परीक्षा देत घवघवीत यशही मिळवले. कचरा वेचक म्हणून काम करत मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या मोनिका यांच्या या यशाचे कौतूक होत आहे. (Maharashtra SSC Board Result Update)

मोनिका तेलंगे या हडपसरमध्ये मुलगी व मुलासह राहतात. मुलगी आठवीमध्ये शिकत आहे. तर मुलगा मंथनसोबत त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्याला दहावीत ६४ टक्के गुण मिळाले असून मोनिका यांनी ५१.८ टक्के गुण मिळवले आहेत. लग्नामुळे त्यांना २००४ मध्येच शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण पुढे शिकण्याची जिद्द होती. अखेर ती संधी कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये आली.

मुले आठवी, नववीत आणि आई २० वर्षांनंतर दहावी पास !

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना मोनिका तेलंगे यांनी सांगितले की, शाळा बंद असल्याने मुलांचे क्लास ऑनलाईन सुरू होते. हे सर्व पाहून त्यांचा अभ्यास घ्यायचे. मंथनच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून येणारे अभ्यास साहित्य वाचत असे. त्यातून दहावीची परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली आणि मंथनसोबत अभ्यास सुरू केला. मंथन खासगी शिकवणीला जायचा. तो घरी आल्यानंतर मला शिकवायचा.

SSC Result : दहावीच्या निकालात पुन्हा लातूर पॅटर्न; १०९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

सकाळी स्वच्छ संस्थेकडे कचरा वेचक म्हणून काम केल्यानंतर दुपारनंतर घरीच असायचे. घरचे काम आटोपून आम्ही सोबतच दररोज रात्री एक-दीड तास अभ्यास करायचो. तशीच परीक्षा दिली आणि आज निकाल आला. दोघेही पास झाल्याने खूप आनंद झाल्याची भावना मोनिका यांनी व्यक्त केली. डॉक्टर बनू इच्छिणारा मंथन आता NEET ची तयारी करणार आहे. तर मोनिका यांना नर्सिंग किंवा इतर कोर्स आणि बारावी परीक्षेची तयारी करायची आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo