जगाची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यास तयार रहा :- राज्यपाल रमेश बैस

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपण क्रांतिकारी असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  स्वीकारत आहोत. या धोरणाद्वारे अध्ययन प्रक्रीयेत गतिमानता आणण्याचा प्रयत्न आहे.

जगाची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यास तयार रहा :- राज्यपाल रमेश बैस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जगातील अनेक देश त्यांना असलेली डॉक्टर, परिचारिका, अभियंते, कुशल कामगार अशा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत जगाच्या कोणत्याही भागात काम करण्यास तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (Dr. D. Y. Patil University) १४ व्या पदवीदान समारंभात केले. 

हेही वाचा : शिक्षण नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई केली का? देवळाणकरांची विद्यापीठांना विचारणा
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लि. चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि बेंगळुरू येथील रामय्या संस्था समूहाच्या गुणवत्ता हमी व उत्कृष्टता कक्षाचे प्रधान सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्यात आली.कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. 

अधिक महत्त्वाचे : जिल्हाधिकाऱ्यांची विद्यापीठाला तंबी; समान संधी केंद्र नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा!
 बैस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपण क्रांतिकारी असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  स्वीकारत आहोत. या धोरणाद्वारे अध्ययन प्रक्रीयेत गतिमानता आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध झाली आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) आणि मशीन लर्निंगच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतच बदल होणार आहेत.आज केवळ साक्षर असणे पुरेसे नाही तर एआय साक्षर असणे आवश्यक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ते शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धती, रोगाचे निदान आणि उपचार या दोन्हींवर परिणाम करणार आहे.उर्वरित जगाच्या तुलनेत आपण एआयमध्ये मागे आहोत. परंतु देशातील युवा पिढी तंत्रज्ञानातील बदलांशी सहज जुळवून घेणारी असल्याने त्याचा भविष्यात लाभ होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या येणाऱ्या युगात आयुष्यभर आणि सतत शिकत रहावे लागेल.विद्यापीठाने आपले शिक्षण एआय आणि मशीन लर्निंगशी कशाप्रकारे अनुरूप करता येईल यासाठी पुढाकार घ्यावा. मानवी बुद्धिमत्ता कोणत्याही एआय प्रणालीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. एआयला सहानुभूती, प्रेमभावना नाहीत, ज्या मानवाकडे आहेत. या भावनांमुळेच तुम्ही समाजाची आणि देशाची सेवा करू शकता, असेही बैस यांनी सांगितले.

 डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, एका संस्थेपासून प्रारंभ करुन संस्थेन ९ हून अधिक संस्था स्थापन केल्या. वैद्यकशास्त्र, नर्सिंग, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी आदी अनेक विद्याशाखांचा विस्तार केला. उच्च गुणवत्तेमुळे विद्यापीठाला नॅक ‘ए++’ अधिस्वीकृती प्राप्त झाली आहे.पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना आता अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ३३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील ४ हजार ९५ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ विद्यावाचस्पती (पीएच.डी.), ३ हजार १५ पदव्युत्तर पदवी, १ हजार ५५ पदवी आणि ११ पदविका या अशा एकूण ८ विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.