सोलापूरच्या गुरूजींनी जीवावर उदार होत धुमसत्या मणिपूरमधून परत आणले विद्यार्थी 

एकूण १४ मणिपुरी विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. यापैकी १ विद्यार्थी ७ वी मध्ये, ९ मुले ६ वी मध्ये तर ४ विद्यार्थी ५ वी मध्ये शिकत आहेत.

सोलापूरच्या गुरूजींनी जीवावर उदार होत धुमसत्या मणिपूरमधून परत आणले विद्यार्थी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षणाचा (Education) बाजार सुरु झाला आहे, हे वाक्य आता नेहमीचे झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे, तन्मयतेने शिकवणारे शिक्षक (Teacher) कमीच. पण जर एखादा शिक्षक फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांचे वर्ष, शिक्षण वाया जाऊ नये म्हणून अक्षरशः आपल्या जीवावर उदार होत असेल तर. सध्या मणिपूरमध्ये (Manipur) सुरु असलेल्या दंगलींमुळे संपूर्ण देश काळजीत आहे. सोलापूर (Solapur) येथील शिक्षक अनंत अलिशे (Anant Alishe) हे मणिपूरमधील दंगलग्रस्त भागातील आपल्या विद्यार्थ्यांना परत शाळेत आणण्यासाठी मणिपूरला जातात अन् सर्व अडचणींवर मात करून अखेर आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत परतात. 

सोलापूर येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेत दुर्गम भागातील, वनवासी भागातील मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत मागच्यावर्षी मणिपूर येथील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांना शाळेत आणण्यात आले होते. एकूण १४ मणिपुरी विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. यापैकी १ विद्यार्थी ७ वी मध्ये, ९ मुले ६ वी मध्ये तर ४ विद्यार्थी ५ वी मध्ये शिकत आहेत. वर्षभर या मुलांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एचटीएमएल, प्रोग्रामिंग, डिकोडिंग असे आधुनिक शिक्षणही  दिले जात होते. पण वार्षिक परीक्षा संपली आणि या मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहता यावे म्हणून १० विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे गुरुजी अनंत अलिशे मणिपूरमध्ये पोहोचले.

सुट्टीसाठी गेले अन् दंगल झाली सुरू

अलिशे २७ एप्रिल रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे पोहोचले, आणि नेमकी त्याच दिवशी दंगलीची ठिणगी पडली. दंगलीत मणिपूरमध्ये आलेला अनुभव, तिथून मुलांना परत सोलापूरला घेऊन येताना आलेल्या अडचणी याबद्दल अलिशे सरांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला. अलिशे म्हणाले, माझ्यासोबत आलेले विद्यार्थी   मणिपूर मधील समेन्ग लॉंग, पुखरूर आणि चुरॅचंदपूर या तीन जिल्ह्यांमधील आहेत.  यामध्ये  चुरॅचंदपूर याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दंगल पेटली आहे. या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ४ मुले माझे विद्यार्थी आहेत. आम्ही २७ एप्रिलला जेव्हा इंफाळ येथे पोहोचलो तेव्हा तिथून या १० मुलांच्या पालकांनी त्यांच्या त्यांच्या मुलांना आपापल्या घरी नेले. मी ९ जून रोजी  समेन्ग लॉंग, पुखरूर या जिल्ह्यातील माझ्या ६ विद्यार्थ्यांना घेऊन पुन्हा सोलापूरला परतलो होतो.

दंगलग्रस्त भागात चुरॅचंदपूर येथे अजूनही माझे ४ विद्यार्थी अडकले होते. त्यांच्या पालकांना, मुलांना त्या परिस्थीतून बाहेर काढायचे होते. इंटरनेट सेवा सुरळीत झाल्यानंतर त्या मुलांच्या पालकांचा शाळेत फोन आला आमच्या मुलांना परत घेऊन जा, अशी -विनंती ते पालक करत होते. पण माझे कुटुंब आणि शाळाही धोका पत्करायला घ्यायला तयार नव्हती. पण मला मात्र माझ्या विद्यार्थ्यांना परत आणायचे होते, त्यांचे वर्ष वाया जाईल याची मला भीती होती. म्हणून मी परत मणिपूरला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी इंफाळला  न जात मिझोराम मार्गे मणिपूर मध्ये जाण्याचे ठरवले. हा मार्ग तुलनेने सुरक्षित आहे असे एका पालकाने मला सांगितले होते, असे अलिशे यांनी सांगितले.

नक्षलवाद्यांशी झाला सामना

मी मिझोराममधील आयझु या जिल्ह्यातील जंगल परिसरात एका  पाल्याच्या घरी थांबलो होतो. हे ठिकाण सुरक्षित होते. पण आता माझ्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मला चुरॅचंदपूरला जायचे होते. हे अंतर ३००-३५० कि.मी. होते. पण हे अंतर कापायला आम्हाला दोन दिवस प्रवास करावा लागणार होता. दंगलीमुळे प्रवासासाठी  सरकारी वाहने उपलब्ध नव्हती आणि खाजगी वाहनाने जाण्यासाठी १६-१७ हजार रुपये लागणार होते. मी ज्या कुटुंबात राहत होतो त्यांचे ओळखीचे एक गृहस्थ धन धान्याची गाडी घेऊन   चुरॅचंदपूरला जाणार होते. मी त्यांच्यासोबत  दोन दिवसांचा प्रवास करून चुरॅचंदपूरला पोहोचलो तिथून माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन मिझोरामला परतत असताना आमचा सामना नक्षलवाद्यांशी झाला. त्यांना माझ्यावर संशय आला होता, त्यांनी माझ्यासोबतच्या मुलांना माझ्याविषयी विचारले मुलांनी मी शिक्षक असल्याचे सान्गितले आणि मी त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या शाळेत न्यायला आलो आहे असे त्यांच्या भाषेत सांगितले, तेव्हा त्या नक्षलवाद्यांनी मला तिथून जाऊ दिले. शेवटी ५ जुलै रोजी मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन सोलापुरात दाखल झालो, असा थरारक अनुभव अलिशे यांनी सांगितला.

यावेळी अलिशे यांनी तिथे जळालेली घरे, पडक्या शाळा, निराश्रित झालेले कुटुंब, अनाथ मुले, पुढच्या क्षणी काय होईल, याचा भरवसा नसताना जीव मुठीत धरून लपून बसलेले कुटुंब आणि गगनाला भिडलेली महागाई अशी विचलित करणारी परिस्थिती जवळून अनुभवली. पण काहीही करून मुलांना परत शाळेत आणायचे या ध्येयाने पछाडलेले अनंत अलिशे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सुखरूप शाळेत आणले. या पैकी काही विद्यार्थ्यांचे पालक अजूनही मिलिटरी कॅम्प मध्ये राहत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD