सेतू अभ्यासाने वाढतेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता; सर्वेक्षणातून महत्वाचे निष्कर्ष समोर

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा अभ्यास तयार केला असून त्याची अंमलबजावणीही परिषदेकडून केली जात आहे. याबाबत परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी सविस्तर माहिती दिली.

सेतू अभ्यासाने वाढतेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता; सर्वेक्षणातून महत्वाचे निष्कर्ष समोर
Setu Abhyas

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांचा (Students) झालेला अध्ययन हास भरून काढणे आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत (Educational Excellence) वाढ करण्याच्या उद्देशाने राज्यात शिक्षण विभागाकडून (Education Department) सेतू अभ्यास (Setu Abhyas) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी राज्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगली वाढ होत असल्याचे निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (MSCERT) हा अभ्यास तयार केला असून त्याची अंमलबजावणीही परिषदेकडून केली जात आहे. याबाबत परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. शालेय गुणवत्तेवर या सर्वाचा परिणाम होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

शालेय शिक्षणात महाराष्ट्राची घसरण का? शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंनी सांगितले कारण...

याकरिता विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन हास भरून काढणे आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे हे शालेय शिक्षण विभागाला दिलेले KRA (Key Result Area) पूर्ण करणे व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सार्थक पुस्तिकेतील राज्याने पूर्ण करावयाच्या टास्कपैकी विद्यार्थ्यांना सेतू अभ्यास उपलब्ध करून देणे हा एक महत्त्वपूर्ण टास्क पूर्ण करणे या उद्देशासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सेतू अभ्यास ऑनलाईन आणि छापील स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर्षी राज्यात ४ ते २६ जुलै या कालावधीत उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती दिवेगावकर यांनी दिली.

सेतू अभ्यासाच्या परिणामकारकतेचे सर्वेक्षण

राज्यात यापूर्वी राबविण्यात आलेल्या पुनर्रचित सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास पूर्ण करण्यात आले. यामध्ये नमुना आधारित सर्वेक्षण घेण्यात आले आहे. सर्वेक्षणाद्वारे प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे विश्लेषण करून तयार केलेल्या संशोधन अहवालानुसार सेतू अभ्यास परिणामकारक असल्याबाबतचे पुढीलप्रमाणे निष्कर्ष मिळालेले आहेत.

१. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विषयांच्या पूर्व चाचणी व उत्तर चाचणीच्या शेकडेवारी मध्ये सुमारे ८.१५% ने वाढ झालेली दिसून येते.

२. इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विषयांच्या पूर्व चाचणी व उत्तर चाचणीच्या शेकडेवारी मध्ये सुमारे ५.४७% ने वाढ झालेली दिसून येते.

३. इयत्ता नववी ते दहावीच्या सर्व विषयांच्या पूर्व चाचणी व उत्तर चाचणीच्या शेकडेवारी मध्ये सुमारे ३.१५% ने वाढ झालेली दिसून येते.

PGI 2.0 : शालेय शिक्षणात महाराष्ट्राची 'ग्रेड' घसरली, अध्ययन निष्पत्ती अन् गुणवत्तेत मागे

सेतू अभ्यासाची उद्दिष्टे

१. कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला अध्ययन हास भरून काढणे.

२. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनाच्या दृष्टीने त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी त्यांना सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक सहाय्य करणे.

३. विषयाच्या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती निहाय कृतींचे दृढीकरण करणे.

४. पुढील इयत्तेचे अध्ययन सुकर होण्यासाठी मूलभूत क्षमता व संकल्पना विकसनावर भर देणे.

PGI-D : सातारा जिल्ह्याने देशात उंचावली मान; शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची घसरण

सेतू अभ्यास (२०२३-२४ ) स्वरूप

१. सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमाच्या एकूण ४६.५६.४३३ विद्यार्थ्यांसाठी छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

३. सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD