ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पध्दतीने करण्यात येणार आहेत.

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
ITI Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांना वेध लागले आहेत ते अकरावी तसेच इतर व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाचे. अनेक विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेश घेतात. त्यांच्यासाठी खुशखबर आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी आयटीआयच्या १ लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये शासकीय संस्थांमध्ये (Government ITI) ९५ हजार ३८० आणि खासगी संस्थांमध्ये (Private ITI) ५९ हजार १२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. (Maharashtra ITI Admission Process)

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यात येणार आहेत. लवकरच याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. यावर्षी एकूण ४१८ शासकीय आणि ५७४ अशासकीय संस्थांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.

विद्येच्या माहेरघरातील संस्थाच NIRF रँकिंगमध्ये पिछाडीवर; पुण्यातील टॉप कॉलेज पाहा एका क्लिकवर...

यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८३ असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उपलब्ध जागांपैकी ५३ हजार ६०० जागा मुलींसाठी राखीव आहेत. इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी २० हजार ७२, अनुसूचित जमातीसाठी १० हजार ८०८,  इतर मागासवर्ग २९ हजार ३३५, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १५ हजार ४३९, विमुक्त जाती ४ हजार ६३१, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे ३ हजार ८५९, ५ हजार ४०४ व ३ हजार ८८ एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी २ हजार ५४८, दिव्यांग उमेदवारांसाठी ७ हजार ७१९ व खुल्या गटातील उमेदवारांसाठी ६१ हजार ७५६ जागा उपलब्ध आहेत.

SSC Exam : पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज भरता येणार; राज्य मंडळाची माहिती

नवीन २५७ तुकड्यांना मान्यता

२०२३ या वर्षापासून नव्याने २५७ तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये ५ हजार १४० एवढ्या जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने ३० तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.

ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये प्रवेशाला सुरुवात

वर्ष २०२३ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण १२ संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण  संचालनालयाचे संचालक डॉ. दिगांबर दळवी यांनी दिली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo