विदर्भात महापाषाणिय शिलावर्तुळांचा शोध

ओशिन बंब या विद्यार्थ्याने शोधलेली ही शिलावर्तुळे अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वीची असुन आदिम समाजातील विशिष्ट दफन पद्धती संदर्भातील आहेत.

विदर्भात महापाषाणिय शिलावर्तुळांचा शोध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क /पुणे 

पुण्यातील डेक्कन कॉलेज (Deccan College Pune )येथे पीएचडी करत असलेला संशोधक ओशिन बंब या विद्यार्थ्याने वर्धा जिल्ह्यातील  (Wardha district ) येसंबा गावाजवळच्या पठारावर पुरातत्वीय लोहयुगीन काळातील ७१ महापाषाणिय शिलावर्तुळांचा शोध (Discovery of megalithic rock circles) लावला आहे. त्याची नोंद जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किआलॉजी अँड आर्किटेक्चरच्या (Journal of History Archeology and Architecture )२०२२ च्या विशेष अंकात झाली आहे.     

     ओशिन बंब या विद्यार्थ्याने शोधलेली ही शिलावर्तुळे अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वीची असुन आदिम समाजातील विशिष्ट दफन पद्धती संदर्भातील आहेत. यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या उत्खननातुन असे समोर आले आहे की तत्कालीन समाजात आपल्या मृत पुर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरविण्याची पद्धत होती. ज्यात मृत व्यक्तीच्या संबंधित लोखंडी, ताम्र व मिश्रधातूची अवजारे ,कधी कधी पशू मृत व्यक्तिसोबत दफन करत होते. अन्य ठिकाणांच्या प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले आहे. येसंबा येथे सुद्धा अशा प्रकारची पद्धत प्रचलित असावी असे संशोधक ओशिन बंब यांचे मत आहे.

    विदर्भात लोहयुगीन अनेक स्थळे अस्तित्वात आहे. ब्रिटिशांनंतर नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज पुणे व महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. येसंबा येथे सापडलेल्या शिला वर्तुळाच्या रचनेमध्ये काही  विशिष्ठ बाबी लक्षात आल्या आहेत. बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे असुन आतमध्ये लहान दगड आहेत. कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्ती बद्दल आदर भाव या कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित झाली असावी. शिलावर्तुळाच्या आकारावरून व मिळालेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो,असे काही अभ्यासकांचे मत आहे.

     येसंबा येथील ही शिलावर्तुळे संरक्षित असणे आवश्यक आहे कारण माती-मुरुम ह्यांचा अतिरेकी ऊपसा वाढत गेल्यामुळे ही धरोहर धोक्यात आल्याचे दिसून येते. त्यांना ही शिलावर्तुळे शोधण्यासाठी स्थानिक रहिवासी श्री पंचशील थूल यांनी मोलाचे सहकार्य केले. वर्धा जिल्ह्याच्या व विदर्भाच्या इतिहासात ह्या संशोधनाने भर पडली असुन याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत डेक्कन कॉलेज येथे कार्यरत प्रा. डॉ. श्रीकांत गणवीर यांनी व्यक्त केले.