सुट्टीचा मुक्त आनंद घ्यायचाय.. मग हा लेख वाचाच

वर्गपाठ, गृहपाठ, घटक चाचण्या ,प्रकल्प ,छोट्या-छोट्या परीक्षा , सहशालेय उपक्रम या साऱ्या गोष्टी काळजीपूर्वक पार पाडल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुक्त आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार...

सुट्टीचा मुक्त आनंद घ्यायचाय..  मग हा लेख वाचाच

नाही गणिताचे ओझे

चला जोपासूया छंद...

सुट्ट्या उन्हाळ्याच्या आल्या

झाला मनाला आनंद... 

           शालेय जीवनातील सर्वात आनंदाचे दिवस म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस. या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद फक्त विद्यार्थ्यांनाच होतो, असे नाही तर शिक्षकांनाही या दीर्घ सुट्ट्या खूप आनंददायी असतात. वर्षभर वेळापत्रकांच्या काटेकोर बंधनातून या सुट्ट्या मोकळेपणाचा आनंद देतात.  हेही तितकेच खरे आहे की या उन्हाळी सुट्ट्यांचा खरा आनंद त्याच विद्यार्थ्यांना घेता येतो;  ज्यांनी वर्षभर छान पैकी अभ्यास केलेला आहे.  परीक्षेत छान गुण प्राप्त केलेले आहेत.  वर्षभर नियमित अभ्यास केलेला आहे. वर्गातील शिक्षकांचे शिकवणे लक्ष देऊन ऐकलेले आहे. वर्गपाठ, गृहपाठ, घटक चाचण्या ,प्रकल्प ,छोट्या-छोट्या परीक्षा , सहशालेय उपक्रम या साऱ्या गोष्टी काळजीपूर्वक पार पाडल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुक्त आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार असतो.  शिक्षक मित्रांनाही ज्यांनी मन लावून अध्यापन केलेले आहे, आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांला आपण शिकवलेल्या पाठाचा समजेपर्यंत छान सराव केलेला आहे. आपण वर्गात शिकवलेला प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा आणि जीवनातील उत्साह आणि आनंद वाढवणारा होता, असे शिकवणे विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व समृद्ध आणि श्रीमंत करणारे असते, अशा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या श्रम परिहारासाठी या उन्हाळी सुट्ट्या एक आनंद यात्रा ठरतात. तसेच श्रम करणाऱ्यांनाच विश्राम करण्याचा संपूर्ण अधिकार असतो.

        उन्हाळी सुट्टीतील आनंद देखील सुनोयोजित व्यवस्थित आणि काही ध्येय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी असावा. एरवी अभ्यास , वर्ग कार्य , परीक्षा या धांदली मध्ये ज्ञान संवर्धन चा आनंद घ्यायचा वेळच मिळत नाही, अशी सर्वांची तक्रार असते.  हा दीड दोन महिन्यांचा कालावधी अशा आनंददायी ज्ञानसंवर्धनासाठी फारच उपयुक्त असतो. एखाद्या विद्यार्थ्याला स्वराज्यातील गडकिल्ल्यांची माहिती मिळवायची असेल तर शिक्षकांनी त्यांना स्वराज्यातील गड किल्ल्यांची सचित्र माहिती असलेली छोटी छोटी पुस्तके उपलब्ध करून द्यावी; म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानसंवर्धनाबरोबर राष्ट्रभक्तीची स्वराज्याची स्वराज्य भावनाही जोपासली जाते. 

     विद्यार्थ्यांबरोबरच  शिक्षकांना स्वतःच्या ज्ञान ,आकलन ,उपयोजन आणि कौशल्य विकास याचा एखादा छोटा प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण करून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करता येते. उदाहरणार्थ स्पोकन इंग्लिश साठी दोन महिने निरंतर आणि तयारी करून अस्खलित इंग्रजी बोलण्याचे  कौशल्य आत्मसात करता येते. मराठी व्याकरण, मिशन मराठी व्याकरण हाती घेऊन व्याकरण तज्ञ होता येते आणि आत्मविश्वासाने शाळेत समाजात आणि वर्गात वावरता येते.

       सौंदर्यदृष्टी आणि अभिरुची संपन्न होण्यास मदत 

       निसर्ग आपल्या आनंदाचा आणि सर्जनशील अशा नवनिर्मितीचा एक अभिन्न भाग असतो. विद्यार्थी मित्रांनो आपल्या गावातील किंवा जवळच्या डोंगर टेकड्यांवर जाऊन निसर्गाचा आनंद घेता येईल.  वसंत ऋतुच्या सौंदर्यपूर्ण आनंदचा आस्वाद घेता येईल .ओढे , ओहोळ यांचेही सौंदर्याचे जवळून दर्शन घेता येईल. विविध ऋतूचे सौंदर्य सोहळे जवळून अनुभवता आल्यास आपली सौंदर्यदृष्टी आणि अभिरुची संपन्न व्हायला खूप छान मदत होते. अगदी विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही हे सृष्टीचे सौंदर्य जवळून न्याहाळता येईल. या सुंदर निसर्गाच्या कविता एकत्र करून त्याच डोंगर टेकड्यांवर जाऊन गाता येतील.  त्या कविता गाणे सुंदर गाणी समजून घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही अशा कविता करता येतील. फुललेली पळसफुले ,हिरवीगार नवी पाने अम्रवृक्षावरील मोहर आणि आम्रफळे पाहता येतील. सूर्योदयापूर्वीची पूर्व दिशा आणि प्रकाशमान असमंत पाहण्याचा आनंद तर काही औरच असतो.

             पुस्तकांची निर्मिती येईल करता

     शिक्षक मित्रांनो या दीर्घ सुट्ट्यांमध्ये आपल्या आवडीच्या विषयावर तुम्ही लेखन करून एखादे सुंदर पुस्तक लिहून प्रकाशित करू शकता. काहींना  जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या अभंगाच्या गाथेतील मानवी जीवन मूल्यांवर आधारित अशा अभंगांचे संकलन करून विद्यार्थी , शिक्षक आणि पालकांसाठी त्या अभंगाचा सोपा सुलभ आणि शुगम अर्थ सांगून सर्जनशील अशा पुस्तकांची निर्मिती करता येईल. काही विद्यार्थी , शिक्षकांना या दीर्घ सुट्ट्यांमध्ये भारतीय संस्कृतीची विरासत, ऐतिहासिक स्थळे ,भौगोलिक स्थळे यांना भेटी देऊन आपले अनुभव विश्व समृद्ध करता येईल. अध्यापनाला अशा अनुभवामुळे समृद्धीचे अधिष्ठान प्राप्त होते. विद्यार्थी भावविश्व ही समृद्ध होते.

              मुलाखती घेण्याचे कौशल्य 

     उन्हाळ्याच्या या दीर्घ सुट्ट्या विद्यार्थ्यांच्या प्रतिमा गुणांच्या संवर्धनासाठी खूपच उपयोगी पडतात.  गावातील शहरातील यशस्वी खेळाडू समाजसेवक पद्मश्री, पद्मभूषण यासारखे पुरस्कार मिळालेले महान पुरुष आणि महिलांच्या मुलाखती घेण्याबाबत शिक्षकांनी प्रेरणा आणि मार्गदर्शन केल्यास विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती सशक्त आणि संपन्न होण्यास मदत होत.  गावातील जुने लोककलावंत, कलाकार यांच्या कलेबाबतच्या विविध पैलूंची माहिती, त्यांची साधना याबाबत मुलाखती घेता येतील. त्यामुळे त्या थोर कलावंतांनाही सन्मानित केल्याचा आनंद मिळेल, अशा मुलाखती घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत अनौपचारिक गप्पा कशा मनमोकळेपणाने करता येतील. याबाबत शिक्षक मित्रांनो आपण आपल्या विद्यार्थ्यांना अशा मुलाखती घेण्याची प्रात्यक्षिके वर्गात संस्कृत केल्यास विद्यार्थी चतुरस्त्र प्रतिभेचे व्हायला वेळ लागणार नाही.

      शाळा ही विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा असते. शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांचे देखील व्यक्तिमत्व संपन्न व्हावे ते सर्व सर्वांगाने भरून यावे ,अशी अपेक्षा असते. परंतु शाळा सुरू असताना औपचारिक अभ्यासक्रम पाठ्यक्रम अध्यापन पाठ्यपुस्तके परीक्षा यामध्ये आपला बहुतांश वेळ जातो.  त्यामुळे जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्ञान उपाययोजना अभिरुची तर्कबुद्धी प्रतिभा प्रज्ञा विश्लेषण संश्लेषण सामर्थ्याचा विकास करायला बऱ्याच मर्यादा पडतात.  त्यामुळे शालेय जीवनातील अशा दीर्घ सुट्ट्यांचा सकारात्मक सर्जनशील आनंद निर्मितीसाठी उपयोग करायला हरकत नाही.विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांनी अशा दीर्घ उन्हाळी सुट्ट्यांमध्ये व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगण विकास करण्यासाठी वातावरण निर्मिती करायला हवे . ज्या सदगुणांचा आणि प्रतिभा शक्तीच्या क्षमता आणि सामर्थ्याच्या विकास शक्य नाही; तो अशा दीर्घकालीन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये करायला हवा.

 

     - डॉ. गोविंद नांदेडे,माजी प्राथमिक शिक्षण संचालक , महाराष्ट्र राज्य