अनेक पिढ्या घडविणारे जयकर ग्रंथालय - जागतिक पुस्तक दिन विशेष

इतिहासाची साक्ष देणारी दीडशे वर्षांहून अधिक जुनी विद्यापीठाची मुख्य इमारत आणि मागील अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाचा स्त्रोत ठरलेले जयकर ग्रंथालय म्हणजेच जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र.

अनेक पिढ्या घडविणारे जयकर ग्रंथालय - जागतिक पुस्तक दिन विशेष

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/पुणे 

   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हटलं की झपकन डोळ्यासमोरून काही गोष्टी समोर येतात. त्यात विद्यापीठातील निसर्गरम्य परिसर, इतिहासाची साक्ष देणारी दीडशे वर्षांहून अधिक जुनी विद्यापीठाची मुख्य इमारत आणि मागील अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाचा स्त्रोत ठरलेले जयकर ग्रंथालय म्हणजेच जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र..!!

    वाचाल तर वाचाल.. असे नेहमी म्हटलं जात. तसेच वाचन चळवळ वाढावी म्हणून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात.पण अलिकडची पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या दुनियेतच हरवत चालली आहे. असे असले तरी आजही अनेक तरूण तरूणी दररोज कोणते ना कोणते पुस्तक वाचत असल्याचे पाहून मनाला समाधान लाभते . २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने अनेक पिढ्या घडवणा-या जयकर ग्रंथालयाचा घेतलेला हा धांडोळा.

  यंदाचे वर्ष हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंच्याहत्तरावे म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आहे. तर जयकर ग्रंथालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष हे पुढील वर्षी सुरू होणार आहे. विद्यापीठाची स्थापना १९४९ मध्ये झाल्यानंतर लगेचच १९५० साली विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली. पुढे १९५७ मध्ये ग्रंथालयाला स्वतंत्र इमारत मिळाली व ग्रंथालयाला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु.रा.जयकर यांचे नाव देण्यात आले. २०१७ साली जयकर ग्रंथालयाचे नाव जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र करण्यात आले. विद्यापीठ जसजसे विस्तारत गेले तसे ग्रंथालय देखील विस्तारत होते. आजमितीला ग्रंथ, छापील नियतकालिके, छापील प्रबंध, हस्तलिखिते, नकाशे, ई ग्रंथ, सांगीतिक ठेवा, फोटो, ई डेटाबेस, ई नियतकालिके आदी ४ लाख ७७ हजार ग्रंथांचा संग्रह केंद्रात उपलब्ध आहे. प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे ग्रंथ आहेत. या भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमधील भाषांतरित साहित्य उपलब्ध आहे.

   जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र म्हणाल्या , या केंद्रात विद्यापीठाच्या विविध विभागांकडून सुचविण्यात आलेल्या पुस्तकांची दरवर्षी खरेदी केली जाते. ग्रंथालयातील संख्यात्मक साहित्य दरवर्षी वाढतेच परंतु गुणात्मक दर्जा देखील टिकविण्याचा आमचा प्रयत्न असतो. या केंद्रात दुर्मिळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत.  विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत, त्यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ई शोधसिंधू या योजनेमार्फत देखील २००४ सालापासून १४ ई जर्नल उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ई कॅटलॉग देखील उपलब्ध आहे.

विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक या ज्ञानस्त्रोत केंद्राचा लाभ घेतात. त्यासोबतच बाहेरील व्यक्तींना नियम व अटींचे पालन करत येथील पुस्तके संदर्भासाठी वापरता येतात. विद्यापीठातील हजारो विद्यार्थी या ग्रंथालयाचा तसेच येथे असणाऱ्या पाच मजली अभ्यासिकेचा लाभ घेतात. यात जवळपास एकूण हजार विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय करण्यात आली आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे देखील याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचा माझ्या जडण घडणीत वाटा असल्याचे सांगितले आहे. केवळ नागराज मंजुळेच नाही तर आज मोठ्या पदांवर गेलेल्या विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांची नाळ ही विद्यापीठाशी आणि या ग्रंथालयाशी जोडलेली आहे.