विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी परीक्षाच केली कायमची रद्द

पूर्वी संस्थेत एका सत्रामध्ये परीक्षांचे दोन संच असायचे, प्रत्येक सत्राच्या शेवटी अंतिम परीक्षा आणि सतत मूल्यमापनासाठी परीक्षा होत होत्या. पण याचा थेट ताण विद्यार्थ्यांवर येतो, याचे दुष्परिणाम होत आहेत.

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी परीक्षाच केली कायमची रद्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही वर्षात केंद्रीय विद्यापीठे (Central Universities), आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि आयआयएसईआर सह उच्च शिक्षण संस्थांमधील (Higher Educational Institutes) विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. अभ्यासाचा वाढता ताण आणि वाढती स्पर्धा याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन ते आत्महत्येला प्रवृत्त होतात किंवा निराशेत जातात. या गोष्टी टाळण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीने (IIT Delhi) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संस्थेने सत्र परीक्षेतील एक परीक्षा संच रद्द केला आहे.

पूर्वी संस्थेत एका सत्रामध्ये परीक्षांचे दोन संच असायचे, प्रत्येक सत्राच्या शेवटी अंतिम परीक्षा आणि सतत मूल्यमापनासाठी परीक्षा होत होत्या. पण याचा थेट ताण विद्यार्थ्यांवर येतो, याचे दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेने सत्र परीक्षेतील एक संच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी माहिती देताना संस्थेचे संचालक रंगन बॅनर्जी म्हणाले, " आयआयटीमधील विद्यार्थी अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेतून येतात. इथे येणारे सर्व विद्यार्थी खूप हुशार असतात त्यामुळे इथे प्रचंड स्पर्धा आणि चढाओढ लागलेली असते. याविषयी आम्ही संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. आणि परीक्षेचा ताण कमी करण्याचा निर्णय घेतला."

युवा पिढीला काय हवे आहे? संशोधनातून समोर आले धक्कादायक वास्तव

बॅनर्जी म्हणाले, "कोणतीही आत्महत्या ही दुःखद असते आणि ती प्रत्येकासाठी हृदयद्रावक असते. आम्हाला एक सक्षम परिसंस्था निर्माण करावी लागेल. जेणेकरुन जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याला भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागतो, तेव्हा तो किंवा ती कोणाशी तरी संपर्क साधू शकेल आणि योग्य समुपदेशन मिळवू शकेल. यादृष्टीने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकाची व्यवस्था केली आहे.  

ज्या विद्यार्थ्यांची कामगिरी खालावते आहे त्यांचा आम्हाला मागोवा घ्यायचा आहे जेणेकरून त्यांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. याशिवाय आम्ही आमच्या संस्थेतील मूल्यमापनाची प्रक्रियाही अधिक सुधारित करणार आहोत, असे बॅनर्जी यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसा, केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि आयआयएसईआरसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये २०१९ पासून २०२३ पर्यंत गेल्या पाच वर्षांत ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सन २०२३ मध्ये आतापर्यंत उच्च शिक्षण संस्थांमध्ये २० विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्या केलेल्या ९८ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रकरणे आयआयटी (३९), त्यानंतर एनआयटी (२५), केंद्रीय विद्यापीठे (२५), आयआयएम (४), आयआयएसईआर (३) आणि आयआयआयटी (२) मधील आहेत. गेल्या चार वर्षांत नोंदवलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक प्रकरणे अभियांत्रिकी संस्थांतील आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo