दीपक केसरकरांची घोषणा हवेतच; शिक्षक भरती कधी सुरू होणार?

राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये तर शिक्षकच नसून अनेक शाळा एका शिक्षकावर सुरू आहेत. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.

दीपक केसरकरांची घोषणा हवेतच; शिक्षक भरती कधी सुरू होणार?
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी पावसाळी अधिवेशनात शिक्षक भरतीची (Teachers Recruitment) प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी भरतीचे संपूर्ण वेळापत्रकच जाहीर केले होते. पण या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही सुरू न झाल्याने टीईटी (TET) उत्तीर्ण उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अद्याप संचमान्यताच अंतिम न झाल्याने भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याचे चित्र आहे. (Maharashtra Recruitment News)

राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये तर शिक्षकच नसून अनेक शाळा एका शिक्षकावर सुरू आहेत. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. याची कबुली खुद्द दीपक केसरकर यांनीही अनेकदा दिली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. यावेळी केसरकर यांनी विधानपरिषदेत शिक्षक भरतीचे वेळापत्रकच जाहीर केले होते.

शाळांमध्ये आठवड्यातून फक्त २९ तास अध्यापन; अभ्यासाचा ताण कमी

पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. याबाबत माहिती देताना केसरकर म्हणाले होते की, शिक्षकभरती प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकाराने दखल घेऊन स्थगिती दिली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठवली आहे. त्यानुसार भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पोर्टलवर जाहिरातीसाठी दि. १५ ते ३१ ऑगस्ट २०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत प्राधान्यक्रम देता येतील. तर १० ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी ११ ते २१ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी २१ ते २४ ऑक्टोबर हा कालावधी असेल.

केसरकर यांच्या घोषणेला आता महिना उलटून गेला. पण त्यानंतरही भरती प्रक्रियेबाबत शिक्षण विभागातील अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण उमेदवारांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या उमेदवारांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर पवार यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. शिक्षक आमदारांकडूनही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, शिक्षणमंत्र्यानी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले होते. पण शिक्षक भरतीचा मुळ पाया हा संचमान्यता आहे. पण अजूनही अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता झालेली नाही. संच मान्यता झाल्याशिवाय अतिरिक्त शिक्षक किती आणि त्यांचे समायोजन करून उर्वरित रिक्त जागांचा आकडा समोर येणार नाही. त्याशिवाय भरती प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने संचमान्यता पूर्ण करण्याची गरज आहे. शिक्षण विभागाकडे रिक्त जागांचा आकडाच उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षक भरती सुरू होऊ शकत नसल्याचे काळे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo