परीक्षा विभागातील लुटारूंच्या मुसक्या कोण आवळणार ? 

अडलेल्या विद्यार्थ्यांकडून चिरीमिरी घेणारे अजूनही काही कर्मचारी परीक्षा विभागात कार्यरत आहेत.त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय विद्यापीठाची डागळत चाललेली प्रतिमा सुधारणार नाही,

परीक्षा विभागातील लुटारूंच्या मुसक्या कोण आवळणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागातील संजय नेवसे  (exam department - Sanjay nevase) या कर्माचा-याला गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्या प्रकरणी निलंबित (Suspended for taking money from students) करण्यात आले.पण अडलेल्या विद्यार्थ्यांकडून चिरीमिरी घेणारे अजूनही काही कर्मचारी परीक्षा विभागात कार्यरत आहेत.त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय विद्यापीठाची डागळत चाललेली प्रतिमा सुधारणार नाही,अशी माहिती विद्यापीठाचे हित चिंतणा-या ज्येष्ठ कर्माचा-यांनी दिली.

हेही वाचा: शिक्षण विद्यार्थ्यांची लूट करणारा विद्यापीठातील तो कर्मचारी निलंबित

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात नेहमीच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येते.विद्यापीठाशी संलग्न असणा-या पुणे , अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील विद्यार्थी गुणपत्रिका, पदवी प्रदान प्रमाणपत्र, ट्रान्सक्रिप्ट आदी कागदपत्र घेण्यासाठी विद्यापीठात येतात.विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी किंवा प्रवेशाची मुदत काही दिवसांवर आल्याने फारच तत्परतेने काही कागदपत्रे मिळणे गरजेचे असते.मात्र, त्याचाच फायदा विद्यापीठातील काही कर्मचारी घेत आहेत.सुमारे दहा अकरा वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गुणवाढ घोटाळा समोर आला होता.एका विद्यार्थ्याला 3 एवजी 13 गुण देण्यात आले होते.त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील काही कर्माचा-यांवर निलंबनाची कारवाई झाली होती.आता पुन्हा एकदा संजय नेवसे याने केलेल्या कृत्यामुळे परीक्षा विभागाचे नाव खराब झाले आहे.

परीक्षा विभागात निकाल दुरूस्तीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाचा टारगेट करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते.गुणपत्रिका देण्यासाठी बॅंकेत चलन भरावे लागते, असे सांगून काही कर्मचारी विद्यार्थ्यांकडून 1 ते 4 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळतात.संलग्न महाविद्यालयाने पत्र दिलेले असल्यामुळे गुणपत्रिका देण्यास कोणतीही अडचण येत नाही.मात्र, त्यात आर्थिक गैरव्यवहार केला जातो.ब-याच कालावाढीपासून हा प्रकार सुरू आहे.परंतु, तो समोर आला नव्हता.नेवसे याला पुराव्यसह पकडल्यानंतर विद्यार्थ्यांना यांचे गांभीर्य लक्षात आले.विद्यार्थ्यांकडून पैसे मागणारे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत.तसेच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही कर्माचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते.

परीक्षा विभागातील अनेक कर्मचारी विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्यासाठी रात्रंदिवस काम करतात.आपल्या हातून चूक होऊ नये, यांची काळजी घेतात.पण चार-दोन चुकीची कामे करणा-यांमुळे संपूर्ण परीक्षा विभागाची व विद्यापीठाची बदनामी होते.त्यामुळे हजारो रुपये पगार घेऊनही विद्यार्थ्यांकडून चिरीमिरीची अपेक्षा करणा-यांच्या  मुसक्या आवळल्याचा पाहिजे,असे विद्यापीठातील काही हितचिंतक सांगत आहेत.