NMMS : इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात
इयत्ता ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न तीन लाख ५० हजारांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) दि. १० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. (Scholarship Scheme)
इयत्ता ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न तीन लाख ५० हजारांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांना परिषदेच्या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांमार्फत अर्ज भरता येतील.
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात. मात्र, त्यासाठी साडे तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे. तसेच विद्यार्थ्याला इयत्ता सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचीत जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
'एनईपी'च्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख ४० हजार निरीक्षरांना करणार साक्षर
विनाअनुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत. ही परीक्षा १० डिसेंबर रोजी होणार असून गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.
परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने २३ ऑगस्टपर्यंत १२० रुपये नियमित शुल्क भरून तर २ सप्टेंबरपर्यंत २४० रुपये विलंब शुल्क आणि ३६० रुपये भरून अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दहावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, असे ओक यांनी सांगितले.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD
eduvarta@gmail.com