पॅट परीक्षा नियोजनाचा सावळा गोंधळ ; विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळेनात 

प्रथम भाषा , इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील प्रोग्रेशन असेसमेंट टेस्ट अर्थात पॅट परीक्षा 4  ते 6  एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

पॅट परीक्षा नियोजनाचा सावळा गोंधळ ; विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळेनात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) घेतल्या जाणाऱ्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट (Progressive Assessment Test)अर्थात पॅट (PAT) परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थी संखेच्या तुलनेत अपुऱ्या प्रश्नपत्रिका (Question papers) दिल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा एका दिवसावर आलेली असताना शाळांना विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यातच अनेक प्रश्नपत्रिका या दहा ते बारा पानी आहेत.परिणामी शाळा किंवा शिक्षकांना एनवेळी झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.4) या विद्यार्थ्यांची पॅट परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शाळा समोर उभा राहिला आहे.

प्रथम भाषा , इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील प्रोग्रेशन असेसमेंट टेस्ट अर्थात पॅट परीक्षा 4  ते 6  एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या असून या प्रश्नपत्रिका जिल्हास्तरावरून प्रत्येक शाळेला वितरित केल्या जात आहेत. परंतु, शाळांनी केलेल्या मागणीनुसार प्रश्नपत्रिका मिळाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.राज्यभरातील इयत्ता तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची पॅट परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, प्रश्नपत्रिका नसतील तर परीक्षा कशी घ्यायची याबाबत शाळा व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 शाळेने गणित विषयाच्या इयत्ता पाचवीच्या 55 प्रश्नपत्रिका मागीतल्या होत्या.त्यावर केवळ 5 प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. तसेच सहावीच्या 78 प्रश्नपत्रिकाएवजी 4 आणि सातवीच्या 75 प्रश्नपत्रिका मागवल्या असताना केवळ 5 तर आठवीच्या 100 प्रश्नपत्रिकांची मागणी केलेली असताना केवळ 20 प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या आहेत,असे एका शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले.  

मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, शाळांनी विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिकेची मागणी केली होती. परंतु, केलेली मागणी आणि वितरित झालेल्या प्रश्नपत्रिका यात खूप मोठी तफावत आहे. तसेच अनेक प्रश्नपत्रिका या दहा ते बारा पानांच्या आहेत.या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वितरित करणे शिक्षक व शाळांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याशिवाय परीक्षा घेणे शक्य नाही.प्रश्नपत्रिका पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.मात्र,सध्य परिस्थिती त्यात गोंधळ असल्याचे दिसून येते.
-----------------
जिल्हास्तरावरून केलेल्या मागणीनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.तसेच प्रश्नपत्रिका बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद