लोणावळ्यात अँम्बी व्हॅलीमध्ये भरणार शिक्षण विभागाची ‘शाळा’

दिनांक २८ व २९ एप्रिल अशी दोन दिवस ही कार्यशाळा होणार असून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अध्यक्षस्थानी असतील.

लोणावळ्यात अँम्बी व्हॅलीमध्ये भरणार शिक्षण विभागाची ‘शाळा’
Aamby Vally Representative image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department) वतीने स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) या धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे (Educational Workshop) आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा लोणावळा (Lanavala) येथील द अँम्बी व्हॅली सिटी (Aamby Vally City) येथे होणार आहे.

दिनांक २८ व २९ एप्रिल अशी दोन दिवस ही कार्यशाळा होणार असून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) अध्यक्षस्थानी असतील. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा : जोडा आधार, नाहीतर थांबणार पगार; शिक्षकांमध्ये संतापाची लाट

राज्यातील मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक, बालभारतीचे संचालक, सर्व विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासह राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, मनपा व नगरपरिषदेचे शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील अधिकारी वर्ग आदी अधिकारीही या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रांत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे व डॉ. नेहा बेलसरे या घेतील. त्यानंतर प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापनाचे शास्त्र या विषयावर मार्गदर्शन होईल. कैलास पगारे हे निपुण भारत या विषयावर सादरीकरण करतील. दुपारच्या सत्रात यवतमाळ, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील उत्तम शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण होईल. त्यानंतर मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : नोंदवही नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर एफआयआर; राज्य सरकारचा निर्णय

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र स्टार प्रकल्प, समग्र शिक्षेशी संबधित प्रकल्प, पी. एम. श्री. शाळा या विषयावरील सादरीकरणाने होईल. कैलास पगारे हे या विषयावर सादरीकरण करतील. कौस्तुभ दिवेगावकर हे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण व भाषा, गणिताची स्थिती या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर नवभारत साक्षरता अभियान या विषयावर सादरीकरण करतील. तर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील हे बालभारतीशी संबधित विषयावर संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने शाळा समूह या विषयावर सादरीकरण होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर सूरज मांढरे व कौस्तुभ दिवेगावकर हे संवाद साधतील. दुपारच्या सत्रात आदर्श शाळांची सद्यस्थिती यावर चर्चा  होईल. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्या समारोपपर मार्गदर्शनाने कार्यशाळेची सांगता होईल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी हे आभार प्रदर्शन करतील.