तीन वर्षानंतरही आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाबाबत संदिग्धता कायम

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली. तसेच त्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली.

तीन वर्षानंतरही आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाबाबत संदिग्धता कायम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मोठा गाजावाजा करत देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (International Sports University) पुण्यात (Pune) स्थापन करण्याची घोषणा झाली. परंतु, तीन वर्षानंतरही या विद्यापीठात एकही अभ्यासक्रम सुरू झाला नाही. एवढेच काय तर विद्यापीठाला अद्याप पूर्णवेळ कुलगुरू (Vice Chancellor) आणि इतर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले गेले नाही. त्यामुळे आता क्रीडा विद्यापीठ पुण्यात सुरू होणार की औरंगाबादमध्ये (Aurangabad) हलवले जाणार याबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे. तीन वर्षानंतरही क्रीडा विद्यापीठाची जागा आणि कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होत नसल्याने शासन याबाबत खरचं गंभीर आहे का?  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली. तसेच त्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यासाठी करोडी येथे १७० एकर जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा विद्यापीठ बालेवाडी येथे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील करोडी येथे विद्यापीठ स्थापनेसाठीच्या घोषणेचे काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. राज्य शासनाने दोन्हीपैकी नेमक्या कोणत्या ठिकाणी क्रीडा विद्यापीठ सुरू होणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.

कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर थेट पीएचडी; या तीन महत्वाच्या शिफारशी थांबवतील आत्महत्या?


क्रीडा विद्यापीठ बालेवाडी येथील क्रीडा संकुलात तात्पुरत्या स्वरुपात कार्यान्वित करण्यात आले. तसेच येथे काही अभ्यासक्रमही सुरू करण्याचे ठरले होते. परंतु, तीन वर्षांनंतर एकही अभ्यासक्रम सुरू होऊ शकला नाही. या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या तात्पुरता पदभार एका आयएएस अधिका-याकडे देण्यात आला आहे. विद्यापीठाचे कामकाज पाहण्यासाठी पूर्ण वेळ कुलगुरू नियुक्त करणे गरजेचे आहे. परंतु, अद्याप कुलगुरू व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णयच झाला नाही. शैक्षणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्यामुळे येथील शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्प असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दोघेही सत्तेत आता क्रीडा विद्यापीठ कुठे होणार? 

महाविकास आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले असा आरोप झाला होता. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ होईल, असे स्पष्ट केले होते. आता अजित पवार व देवेंद्र फडणवीस दोघेही सत्तेत आहेत. विद्यापीठ स्थापनेची केवळ घोषणाच करू नये. तर ती अस्तित्वातही यायला हवी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ नेमके कुठे होणार? हे सुद्धा शासनाने स्पष्ट करायला हवे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना कडून व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j