अधिसभा सदस्यांनाच मिळत नाही अधिकृत माहिती ; रॅप साँग प्रकरणावरून रान उठले

विद्यापीठाच्या आजी व माझी अधिसभा सदस्य असलेल्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेतली.

अधिसभा सदस्यांनाच मिळत नाही अधिकृत माहिती ; रॅप साँग प्रकरणावरून रान उठले
SPPU Rap Song Case

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग प्रकरणावरून रान उठले आहे. थेट राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी दखल घेत याबाबत प्रशासनाकडून अहवाल मागविल्याचे समजते. आता अधिसभा सदस्यांनीही (Senate Members) याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच विद्यापीठाच्या परिसरात घडणा-या अशा प्रकरणांबाबतची अधिकृतरीत्या माहिती मिळत नसल्याबद्दल त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. (SPPU Rap Song Case)

विद्यापीठाच्या आजी व माझी अधिसभा सदस्य असलेल्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात दादाभाऊ शिनलकर, गणपत नांगरे, डॉ. राजेंद्र झुंजारराव व डॉ. समीर भोसले या आजी सदस्यांचा आणि डॉ. संजय खरात व डॉ. प्रविण चौधरी या माजी सदस्यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या प्रमुख इमारतीत रॅग साँग चित्रित झालेल्या दालनास भेट दिली.

हेही वाचा : लोणावळ्यात अँम्बी व्हॅलीमध्ये भरणार शिक्षण विभागाची ‘शाळा’

विद्यापीठामध्ये झालेल्या आक्षेपार्ह चित्रीकरणाबाबत दुरचित्रवाणीमधून, समाज माध्यमांमधून व दैनिकांमधून माहिती समाजातील विविध स्तरापर्यंत पोहचलेली आहे. झालेल्या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आक्षेपार्ह चित्रीकरण करणा-या बाहेरील व्यक्ति विद्यापीठाच्या प्रमुख इमारतीच्या आत कशा प्रवेशित झाल्या? त्यांना कोणी परवानगी दिली? त्यांना सुरक्षा रक्षकांनी का अडविले नाही? असे विविध प्रश्न समाजातील विविध स्थरांवरून उपस्थित केले जात असल्याचे अधिसभा सदस्यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाच्या परिसरातील सुविधांचा बाहेरील व्यक्तींनी वापर करण्यावायत सतर्कता बाळगावी, तसेच या बाबतची सुस्पष्ट नियमावली असावी व या नियमावलीचे तंतोतत पालन करण्यात यावे, अशी सूचना शिष्टमंडळाने डॉ. सोनावणे व डॉ. पवार यांना केली. याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांमध्ये उमटली आहे. विद्यार्थी संघटनानी संबंधीत कक्षामध्ये तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी कक्षात तोडफोड झाली व दोन दरवाजांच्या काचा फुटल्या. विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी संघटना यांच्या बरोबर विद्यापीठ प्रशासनाचा उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. अशा संवादामुळे विद्यार्थ्याच्या अडीअडचणी समजून घेणे व त्यावर वेळोवेळी उपाय योजना करणे शक्य होईल, असे अधिसिभा सदस्यांनी सुचविले.

हेही वाचा : जोडा आधार, नाहीतर थांबणार पगार; शिक्षकांमध्ये संतापाची लाट

रॅप साँग प्रकरणाची प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमके काय घडलेले आहे या बाबतची माहिती अधिसभा सदस्यांना मिळावी तसेच सुरक्षा व्यवस्थेत ज्या त्रुटी जाणवतील, त्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. अशा गैरकृत्यांमुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला धक्का पोहचलेला असून असे प्रकार भविष्यात कदापी होऊ नयेत याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही संबंधीत शिष्टमंडळाने विद्यापीठास केलेल्या आहेत. विद्यापीठाच्या परिसरात घडणा-या अशा प्रकरणांबाबतची अधिकृतरीत्या माहिती अधिसभा सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून अधिकृतरीत्या जाहीर होणारी 'प्रेस नोट' सर्व अधिसभा सदस्यांना वेळीच कळविण्यात यावी, असेही शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू व कुलसचिव यांना सांगितले.