जोडा आधार, नाहीतर थांबणार पगार; शिक्षकांमध्ये संतापाची लाट

आधारचा आणि वेतनाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आधार वैधतेच्या नावाखाली वेतन थांबवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.   

जोडा आधार, नाहीतर थांबणार पगार; शिक्षकांमध्ये संतापाची लाट
Aadhar Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ज्या शाळांचे आधार वैद्यतेचे aadhaar updation काम ९५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा शाळांचे वेतन पुढील आदेशापर्यंत अदा करू नयेत, वेतन देयकासोबत संबंधित शाळांचे ऑनलाइन आधार स्टेटस रिपोर्ट Aadhar status report घेण्यात यावेत व त्यांच्या पडताळणीनंतर वेतन अदा करावे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड Pune ZP education officer Sandhya Gaikwad यांनी काढले आहेत. मात्र, त्यास शिक्षकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. आधारचा आणि वेतनाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आधार वैधतेच्या नावाखाली वेतन थांबवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.                                

गेल्या काही वर्षांपासून शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची कार्यवाही केली जात आहे. परंतु संकेतस्थळ योग्य पद्धतीने काम करत नाही, अनेक वेळा ते बंद असते, अपडेट केलेले आधार दुसऱ्या दिवशी पुन्हा अपडेटसाठी दिसतात, अशा अनेक कारणांमुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. मात्र आता आधार वैधतेच्या कामाशी शिक्षकांचे  पगार जोडण्यात आला आहेत . त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.                                         

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीच्या संख्येवर संच मान्यता देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शालेय शिक्षण विभागातर्फे आधार वैधता मोहीम राबवली जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा विचार करता पुणे जिल्हा या कामात काही प्रमाणात मागे आहे. त्यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने शिक्षकांचे वेतन थांबवण्याचा पर्याय शोधला असल्याचे दिसून येत आहे.                           

शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षण विभागाचे पे युनिट अधीक्षक यांनी ९५  टक्के आधार व्हॅलिडेशन करा अन्यथा पगार होणार नाही, असे परिपत्रक काढले आहे. परंतु आधार व सरल वेबसाईट वारंवार बंद पडते. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यापेक्षा शिक्षकांचे पगार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा शाखेच्या वतीने निषेध केला जात आहे. आधार व वेतन यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे याबाबतचे काढलेले परिपत्रक शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा शिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव विकास थिटे यांनी दिला आहे.

प्राथमिक शिक्षक संघटनेनेही यावरून नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे पुणे जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे म्हणाले, न्यायालयाने आधार बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही शिक्षण विभागाने आधारसाठी शिक्षकांचा पगार थांबवण्याची मनमानी केली आहे. संकेतस्थळ बंद असल्याने आणि अपडेशन काम होत नसल्याने शिक्षक वैतागले आहेत. रात्रंदिवस काम करूनही हे काम पूर्ण होत नाही.शिक्षकाचे पगार थांबवून त्यांना उपाशी ठेवायला शासन सांगत नाही.मग हा आदेश कसा काढला गेला.

---------------

"शिक्षकांनी अटोकाट प्रयत्न करूनही आधारचे काम पूर्ण होत नाही. तांत्रिक बाबींमुळे येणाऱ्या अडचणींची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला हवी. पगार थांबवण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.शासनाने आधार वैधतेसाठी मुदतवाढ द्यावी. " - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ