ऐकावं ते नवलच! गाण्यांच्या चालीवर पाठ करा गणिताची सूत्र; भांडारकर गुरूजींचा अनोखा फंडा

भांडारकर हे आकुर्डी येथे खाजगी क्लासेस चालवतात. त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते रॅप आणि बॉलिवूडच्या गाण्यांच्या चालीवर सूत्र शिकवतात.

ऐकावं ते नवलच! गाण्यांच्या चालीवर पाठ करा गणिताची सूत्र; भांडारकर गुरूजींचा अनोखा फंडा
Abhijeet Bhandarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

गणितासारख्या (Mathematics) अवघड विषयाची परीक्षा... गणिताची सूत्र माहित नसेल तर संपलंच. पण पुण्यातील काही विद्यार्थ्यांना ना गणिताची भीती ना सूत्र पाठ करण्याची चिंता, हे विद्यार्थी आरामात एखादे, रॅप साँग (Rap Song) किंवा बॉलिवूड (Bollywood Song) चे एखादे गाणे गुणगुणताना दिसतात. याबद्दल ना त्यांच्या पालकांची तक्रार ना त्यांच्या शिक्षकांची. हा विद्यार्थ्यांचा (Students) निष्काळजीपणा नसून त्यांची अभ्यास करण्याची, अवघड सूत्र पाठ करण्याची पद्धत आहे. ही अनोखी पद्धत त्यांना शिकवली आहे अभिजित भांडारकर (Abhijeet Bhandarkar) या त्यांच्या शिक्षकांनी.

भांडारकर हे आकुर्डी येथे खाजगी क्लासेस चालवतात. त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते रॅप आणि बॉलिवूडच्या गाण्यांच्या चालीवर सूत्र शिकवतात. याची कमाल अशी झाली की विद्यार्थ्यांना ही अवघड सूत्र अगदी तोंडपाठ होत आहेत. भांडारकर यांच्या या कार्याची दखल २०२० मध्ये टाइम्स बुक, २०२२ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आता २०२३ मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. 

हेही वाचा : NEET UG 2023 : कशी असेल यावर्षीची परीक्षा; जाणून घ्या ऐका क्लिकवर...

भांडारकर यांच्या या अनोख्या शिकवण्याच्या पद्धतीची कमाल म्हणजे त्यांच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये गणिताच्या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. भांडारकर यांच्या या शिकवण्याच्या नवीन 'फॉर्मुल्या' चा जन्म कसा झाला, त्यांना ही कल्पना कशी सुचली याविषयी त्यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला.

भांडारकर म्हणाले, "वास्तविक पाहता मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. पण गणित या विषयामुळे मी ६ वेळा नापास झालो. कारण मला सूत्र लक्षात राहत नव्हती. माझ्यासारखेच इतरही बरेच विद्यार्थी होते ज्यांना सूत्र लक्षात न राहिल्यामुळे ते नापास होत होते किंवा कमी गुण मिळत होते. यावर समस्येवर तोडगा काढण्याचा मार्ग मी शोधू लागलो. २००७ पासून मी हा नवीन प्रयोग सुरु केला. सुरुवातीला लोकांनी मला वेड्यात काढले. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आज जवळपास ५०० विद्यार्थी माझ्याकडे शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा : लिपिक-टंकलेखकच्या निकालावरून रान पेटणार?

"मी आतापर्यंत  १ हजार ८० सूत्र गाण्यांच्या चालीवर बसवली आहेत. गणित हा विषय अजिबात न आवडणारे विद्यार्थी आता त्याच विषयात ८० पेक्षा अधिक गुण मिळवत आहेत. गणित हा विषय शेकडो वर्षांपासून तसाच आहे. त्यात आम्ही काहीच बदल न करता फक्त गणित सांगून देण्याची पद्धत, सूत्र शिकवण्याची पद्धत आम्ही बदलत आहोत. आणि ही नवीन पद्धत युवकांच्या पसंतीस उतरत आहे," असे भांडारकर यांनी सांगितले.