वडिलांनी केला मुलीचा बारावीचा निकाल जाहीर; बोर्डाच्या अध्यक्षांचा असाही योगायोग

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यातील मुलींचा निकाल ९३.७३ टक्के तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के लागला.

वडिलांनी केला मुलीचा बारावीचा निकाल जाहीर; बोर्डाच्या अध्यक्षांचा असाही योगायोग
HSC Board Chaiman Sharad Gosawi with his Daughter Sanskriti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राहुल शिंदे 

HSC Result Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (HSC Board) अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosawi) यांनी बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या १४ लाख १७ हजार ३७१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात गोसावी यांच्या संस्कृती या मुलीचाही समावेश आहे. तिने विज्ञान शाखेत ७७.५० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. (Maharashtra HSC Result) 

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यातील मुलींचा निकाल ९३.७३ टक्के तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलांपेक्षा मुली अधिक गंभीरपणे अभ्यास करत करतात. त्यामुळेच मुलींचा निकाल दरवर्षी मुलांपेक्षा अधिक असतो, असेही ते म्हणाले.

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के; यंदाही मुलींची बाजी

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे सुद्धा इतर पालकांप्रमाणेच एक पालक आहेत. त्यांच्या मुलीने सुद्धा राज्यातील १४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्य मंडळाची बारावीची परीक्षा दिली. तिला इंग्रजी विषयात ८६, भूगोल विषयाला ८८ गुण, गणितामध्ये ६९ गुण, भौतिकशास्त्र विषयात ५५ गुण, रसायनशास्त्र विषयात ७० तर आयटी विषयात ९७ असे एकूण ४६५ गुण मिळाले आहेत. संस्कृती ही बाणेर येथील आदित्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

बारावीच्या निकालानंतर टेन्शन आलंय? एका कॉलवर बोर्डाचे समुपदेशक घालवतील भीती

शरद गोसावी म्हणाले, माझी पहिली मुलगी समृध्दी पुण्यात एमएस्सी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे. संस्कृतीला इंजिनिअरींग मध्ये करिअर करायचे असून तिला जेईई आणि जेईई अँडव्हान्स या दोन्ही परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. राज्याची सीईटी परीक्षा सुध्दा तिने दिली आहे. संस्कृतीने स्वतःच बारावीचा अभ्यास केला. मी 'एम.एस्सी' चा विद्यार्थी असल्याने कमी अधिक प्रमाणात मी तिला केमिस्ट्री विषयाचे मार्गदर्शन केले. परंतु कामाच्या व्यापामध्ये तिच्या अभ्यासासाठी मला फार वेळ देता आला नाही. तिने मिळवलेल्या यशाचा आम्हाला आनंद आहे, अशी भावना गोसावी यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo