SPPU News : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची नियुक्ती महिना अखेरीस?

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाली. त्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

SPPU News : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची नियुक्ती महिना अखेरीस?
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क                                               

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) प्र-कुलगुरूपदी (Pro VC) कोणाची वर्णी लागणार याबाबतचा निर्णय ऑगस्ट महिना अखेरीस होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या पुढील काळात दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची (Management Council) बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्र-कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना महिना अखेरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. (Savitribai Phule Pune University News)

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांची निवड झाली. त्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. राज्यातील इतर कुलगुरूंनी आठवड्याभराच्या आत प्र-कुलगुरूंची निवड केली. मात्र, काही कारणांमुळे विद्यापीठाच्या प्र-कलगुरूंची निवड दिवसेंदिवस लांबत आहे. काहींनी राजकीय हस्तक्षेपामुळे ही नियुक्ती लांबत असल्याचा आरोप केला आहे.

SPPU News : चुका माफ करून विद्यार्थ्यांच्या गुणांची दुरुस्ती करण्याची संधी द्यावी! प्राध्यापक संघटनेची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी आत्तापर्यंत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राचार्यांची निवड केली जात होती. मात्र, माजी प्र-कलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या नियुक्तीनंतर त्यास खंड पडला. विद्यापीठातील प्राध्यापक व विभाग प्रमुख पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, आता विद्यापीठातील प्राध्यापकांची प्र-कलगुरू पदी नियुक्तीची नवी परंपरा निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी जुळवून घेणारा व्यक्ती या पदावर नियुक्त झाल्यास राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरळीतपणे होण्यास मदत होईल.

राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये प्र-कलगुरूंची निवड झाली असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची तयारी झाली आहे. या तुलनेत पुणे विद्यापीठ बरेच मागे आहे. त्यामुळे हा बॅकलाग भरून काढणारी कोणतीही सक्षम व्यक्ती विद्यापीठाला प्र-कुलगुरू म्हणून मिळावी. अतिविलंब करू नये, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या हितचिंतकांकडून व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo