जिल्हा परिषद भरतीचे अंतिम टप्प्यात आलेले गाजर

जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती करण्यासाठी २०१९ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. परंतु, विविध कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रद्द करावी लागली.

जिल्हा परिषद भरतीचे अंतिम टप्प्यात आलेले गाजर
ZP Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ZP Recruitment : जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या १८ हजार ९३९ पदांसाठी नव्याने भरती केली जाणार असून त्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचे गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना (Students) सांगितले जात आहे. परंतु याबाबतची ठोस माहिती मिळत नसल्याने यावेळीही विद्यार्थ्यांना भरतीचे गाजर दाखवले जाणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच भरती होणार की नाही याबाबत शासनाने स्पष्ट सांगावे, विनाकारण अधांतरी ठेवून विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ वाया घालवू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. (Only promises of recruitment for various posts in Zilla Parishad)

जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसह तलाठी, वनरक्षक, नगरपरिषदेमध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती करण्यासाठी २०१९ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. परंतु, विविध कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रद्द करावी लागली. आता नव्याने जाहिरात काढून भरती केली जाणार आहे. परंतु, गेल्या एक-दोन वर्षांपासून 'पुढील काही दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल' , ' दहा ते पंधरा दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे' , ' विद्यार्थ्यांना लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल', 'जाहिरात प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे', अशी वेगवेगळी उत्तरे जिल्हा परिषद व मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

MPSC कडून परीक्षा, निकालांची सद्यस्थिती जाहीर; एका क्लिकवर मिळवा माहिती

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ही आश्वासने ऐकण्याचा कंटाळा आला आहे. कारण मंत्रालयात याबाबत माहिती विचारली तर जिल्हा परिषदेत विचारा, असे सांगितले जाते आणि जिल्हा परिषदेत विचारले तर ग्रामविकास विभागाकडे विचारा, असे सांगितले जाते. राज्य शासनाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांच्या भरतीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. परंतु गेल्या चार वर्षापासून शासनाला जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही.तर १५ ऑगस्ट पूर्वी ७५ हजार जागांची भरती पूर्ण करण्याचे आवाहन शासनासमोर आहे. आता उर्वरित तीन महिन्यांमध्ये शासन ७५ हजारांचे उद्दिष्ट कसे गाठणार ? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

पावसाळ्यापूर्वीच भरती होणार?

जिल्हा परिषदेच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर सुमारे एक महिना अर्ज स्वीकारण्यासाठी द्यावा लागेल. त्यानंतर महिन्याभराच्या आत परीक्षा घेतली तरच राज्यातील सर्व परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा देणे शक्य होईल. कारण जून महिन्यात कोल्हापूर, सातारा ,सांगली या जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसामुळे पूर येतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच या परीक्षा घ्यायला हव्यात. तसेच पुढील काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

ZP Recruitment : आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? मंत्रालयातील ऑडिओ क्लिप व्हायरल

''राज्य शासनाने गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या भरतीचे गाजर विद्यार्थ्यांना दाखवले आहे. गेल्या वर्षभरापासून पुढील पंधरा दिवसात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यात त्यांचा पैसा वेळ खर्च होतोच शिवाय मानसिक ताण तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांना अधांतरी ठेवून शासनाने आता त्यांना भरतीचे गाजर दाखवणे बंद करावे. उडवा उडवी ची उत्तरे न देता तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.''

- रामकृष्ण ढाकणे, परीक्षार्थी विद्यार्थी