विकसित भारताविषयीची कल्पना समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे 

 राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

विकसित भारताविषयीची कल्पना समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे 

 'जी-२० परिषदे'(G-20)च्या यजमानपदाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती आणि परंपरांची ख्याती जगभरात पोहोचविण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्या आधारे येत्या वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रांच्या संदर्भाने जगाला दिशा देण्याचे काम आपला देश करत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची विकसित भारताविषयीची कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांनी काम करावे," असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (minister of higher and Technical Education Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी केले.

 राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.तसेच  जी-२० परिषदेनिमित्ताने पुण्यात नजिकच्या काळात होणा-या शैक्षणिक उपक्रमांचे अनावरण  यावेळी करण्यात आले आहे. या  कार्यक्रमास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजयकुमार, सहसचिव अर्चना अवस्थी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, "जी-२० परिषदेच्या शैक्षणिक उपक्रमांच्या संदर्भाने येत्या वर्षभरात पुण्यात विविध शैक्षणिक उपक्रम, तसेच जगभरातील शिक्षणमंत्र्यांच्या पुणे भेटीचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये अपेक्षित शैक्षणिक उपक्रमांविषयीची जनजागृती या अधिवेशनामध्ये अपेक्षित आहे. उपस्थित सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ही जनजागृती राज्यभरातील सर्व स्वयंसेवकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यंदा राष्ट्रीय सेवा योजनेसाठी जवळपास पाच लाखांवर युवक-युवतींनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. या सर्वांपर्यंत हे उपक्रम पोहोचविल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या विकसित भारत देशाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होणार आहे.

केसरकर म्हणाले,  देशातील युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठेविषयी जाणीव निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होणे शक्य आहे. जगाला एकीकडे कार्यकुशल मनुष्यबळाची असणारी गरज, तर दुसरीकडे तरुणांचा देश म्हणून असणारी भारताची एक वेगळी ओळख आपण सध्या अनुभवत आहोत. देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळाल्यास, देशातील युवक हे केवळ देशासाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुशल मनुष्यबळ म्हणून उपयुक्त ठरू शकतील.

राजेश पांडे म्हणाले, "पुण्यात होणाऱ्या जी-२० एज्युकेशन समिटमध्ये अपेक्षित विविध उद्दिष्टांविषयी राज्यभरातील युवकांना माहिती मिळावी, असे काम या अधिवेशनातून होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये समाजसेवा, देशसेवा आणि एकात्मतेविषयीची जाणीवजागृती निर्माण केली जाते. त्यामुळे या अधिवेशनामागे कोणताही राजकीय अजेंडा नाही, तर हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. युवकांमध्ये देशाच्या विकासाविषयी आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना या विकासप्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आयोजित युवा संवाद संपर्क अभियानाचाच हा एक भाग आहे." या माध्यमातून राज्यभरात युवकांची एक वेगळी चळवळ सुरू होण्याचा विश्वासही पांडे यांनी व्यक्त केला.