मुलांनो, उन्हाळी सुट्टी अशी लावा सार्थकी..डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितल्या या महत्वाच्या टिप्स!

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी याविषयी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. 

मुलांनो, उन्हाळी सुट्टी अशी लावा सार्थकी..डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितल्या या  महत्वाच्या टिप्स!
Summer Vacation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Summer vacation) सुरु झाल्या की मुले खुश असतात पण पालकांसाठी (Parents) मात्र हा सुट्टीचा काळ काळजी वाढवणारा असतो. सुट्टीमध्ये मुलांना मोबाईल (Mobile) आणि टीव्ही (Television) पासून दूर कसे ठेवायचे, मुलांना व्यस्त ठेवायचे पण त्यांना कंटाळाही येता कामा नये आणि मुलांना काही नवीन शिकता यावे, थोडक्यात मुलांचा हा सुट्टीचा काळ सत्कारणी लागावा यासाठी पालक प्रयत्नशील असतात. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Board) माजी अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे (Dr. Shakuntala Kale) यांनी याविषयी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. (How children should spend time during summer vacation)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

मुलांवर वाचन संस्कार करण्यासाठी योग्य वातावरण

मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे, त्यांच्यावर वाचनाचे संस्कार घडावेत, असे सर्व पालकांना वाटत असते. पण त्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण करण्यात बहुतेक वेळेस पालक कमी पडतात. मुलांना फक्त वाचनाचे महत्व सांगून चालत नाही तर त्यासाठी त्यांच्या आजूबाजूला योग्य असे वातावरण निर्माण करायला हवे. पालकांनीही मुलांसोबत बसून  वाचायला हवे, त्याचे अनुकरण मुले करतील. विशेषतः शहरी भागातील मुलांसाठी ते राहत असलेल्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये मुलांच्या आवडीची पुस्तके ठेवायला हवीत. मुलांना गड किल्यांची माहिती गोळा करायला सांगायची त्या माध्यमातून मुले वाचायला लागतील. 

शाळेतील गमतीशीर रंजक उपक्रम घरी घ्यावेत. शाळेत मुलांकडून पीटीच्या तासाला विविध शारीरिक व्यायाम करून घेतले जातात. मुलांना हे व्यायामाचे प्रकार रंजक वाटत असतात. ते व्यायाम पालकांनी घरी मुलांकडून करून घ्यावेत. याशिवाय पाठ्यपुस्तकांमध्ये वर्षभर करण्यासाठी विविध उपक्रम दिलेले असतात. जे उपक्रम शाळेत घेतलेले नसतात ते पालकांनी मुलांकडून सुट्टीत करून घ्यावेत.  राज्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राणी, पक्ष्यांची माहिती गोळा करायची, त्याचे फोटोज जमवायचे, चार्ट बनवायचे, असे विविध उपक्रम यामध्ये मुलांना रुची असेल असे उपक्रम करून घ्यावेत. 

हेही वाचा : नुसती घोकंपट्टी नको; शोधा, निरीक्षण करा : डॉ. रघुनाथ माशेलकर

मोबाईल-टीव्हीला पर्याय नाही पण... 

आताची मुले अगदी पाळण्यात असल्यापासून मोबाईल आणि टीव्ही कडे आकर्षित होतात. आता ऑनलाईन क्लासमुळे मुले अगदी सहजपणे फोन हाताळू लागली आहेत. आता फोन आणि टीव्हीला पर्याय राहिलेला नाही. मुलांवर सक्ती करण्यापेक्षा त्यातून जे चांगले आहे ते घ्यावे. मुलांना टीव्ही मोबाईल पाहण्यापासून परावृत्त करत असताना स्वतः पालकांनीही या गोष्टी टाळण्याकडे लक्ष द्यावे. पालकांनी फोन किंवा टीव्ही वर तासंतास वेळ घालवण्यापेक्षा ठराविक वेळ घालवावा जेणेकरून मुलांनाही ती सवय होईल. शिवाय मुलांसाठी त्यांच्या वयोमानाने त्यांच्यासाठी योग्य असे चॅनेल आणि कार्यक्रम लावून द्यावेत. मोबाईलवर जादूचे खेळ, एखादी कला, खेळ, गोष्टी पाहण्याची सवय लावावी. मुलांना मोबाईलवर ऐतिहासिक वास्तू, जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, स्वातंत्र्य सैनिक आदींविषयी मोबाईलवर शोध घेऊ द्यावा.

मुलांना लिहिते करा... 

मुलांना लिहिण्याची सवय लावावी, मुलांना लहानपणापासून लिहिण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या सुट्यांचा योग्य वापर करता येईल. सुट्यांमध्ये मुलांना दररोज  संपूर्ण दिवसाबद्दल किमान चार वाक्य लिहायला सांगायचे. हळू हळू लिखाण वाढवायला सांगायचे. घरातील विविध वस्तूंची यादी, त्यांचे वर्गीकरण, त्यांचे उपयोग आदी गोष्टी लिहायला सांगायचे ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. 

भाषा ज्ञान वाढवण्यासाठी हे करा 

टीव्ही, मोबाईल पाहत असताना किंवा मोठ्यांचा संवाद होत असताना मुलांच्या कानावर नवीन शब्द पडत असतात. हे नवीन शब्द टिपून घेणे, त्याचे अर्थ शोधणे असे छोटे छोटे उपक्रम मुलांना सांगावेत जेणेकरून त्यांचे भाषा ज्ञान वाढेल. ही एक चांगली सवय मुलांना लागेल. 

हेही वाचा : उन्हाळी सुट्टीत काय करायचं? हा लेख वाचा अन् करिअरला द्या दिशा

मुलांची निरीक्षण शक्ती वाढवा

सुट्यांमध्ये आपण मुलांना विविध ठिकाणी फिरायला नेतो. निसर्गरम्य ठिकाणी नेतो. यावेळी फक्त त्यांना खाऊ घेऊन देणे किंवा फिरवण्यापुरते मर्यादित न राहता यातून त्यांची निरीक्षण शक्ती वाढू शकते. त्या ठिकाणी पाहिलेली झाडे, फुले, पाने, वनस्पतीचे प्रकार, पक्षी, प्राणी, फुलपाखरे यांचे  निरीक्षण  करून ते टिपणे, त्या विषयी अधिकाधिक अभ्यास करणे, त्यांचे चित्र काढून त्याविषयी माहिती लिहिणे या उपक्रमामुळे मुलांमध्ये उत्सुकता वाढेल, त्यांची निरीक्षण शक्ती वाढेल. 

"सुट्यांमध्ये  मुलांना विविध उपक्रमांमधून शिकवताना घडवताना त्यांना त्याची जाणीव न होता नकळतपणे हे सर्व घडले पाहिजे. मुलांच्या ज्ञानात भर पडताना त्यांना त्याचा आनंदही मिळाला पाहिजे. त्यांच्यावर सक्ती न करता त्यांच्याबरोबर या उपक्रमात सामील व्हा. मुलांशी संवाद वाढवा, त्यांच्या ज्ञानात भर पडताना त्यांना आनंद मिळेल तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडेही लक्ष द्या. सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे मुलांचे डिप्रेशन मध्ये जाण्याचे प्रमाण ही कमी होईल. उन्हाळी सुट्यांमध्ये मुलांना व्यस्त ठेवायचे म्हणून त्यांना विविध शिबिरे  आणि कार्यशाळांमध्ये पाठवण्यापेक्षा मुलांचा कल आणि आनंद ओळखून त्यांना आवडेल त्या शिबिरात त्यांना जाऊदे. त्यांना सुट्टीचा आनंद घेऊ द्या.’’

- डॉ. शकुंतला काळे, माजी अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ