नुसती घोकंपट्टी नको; शोधा, निरीक्षण करा : डॉ. रघुनाथ माशेलकर

महाराष्ट्रातील पहिल्या अंतराळ प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुण्यातील मुळशी येथे झाले.

नुसती घोकंपट्टी नको; शोधा, निरीक्षण करा : डॉ. रघुनाथ माशेलकर
Space Lab in Mulshi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील पहिल्या अंतराळ प्रयोगशाळेचे (Space Lab) उद्घाटन नुकतेच प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांच्या हस्ते पुण्यातील मुळशी येथे झाले. यावेळी बोलताना त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झालेली स्वतःची जडणघडण त्याचप्रमाणे भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam), आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उदाहरणे देत शिक्षणाचे महत्वाचे महत्व पटवून दिले. तसेच शिक्षण हेच भविष्य असल्याने भरपूर शिका पण नुसती घोकंपट्टी न करता शोधा, निरीक्षण करा, पहा आणि आत्मसात करण्याचा संदेश डॉ. माशेलकर यांनी दिला.

मुळशी येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Heritage International School) इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर यांच्या पुढाकारातून कलाम माशेलकर स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरचे उद्घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुळशी येथील ही अंतराळ प्रयोगशाळा भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा आहे.

हेही वाचा : बोगस शाळा : एजंट शिवाय शिक्षण विभागाची फाईलच हलत नाही!

उद्घाटनप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील विविध तंत्रज्ञानाची सखोल माहिती उपस्थितांना दिली. त्याचप्रमाणे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांची विस्तृत माहिती दिली. डॉ. माशेलकरांनी मुलांशी भारतातील अनेक मान्यवरांच्या जडणघडणी विषयी दिलखुलास संवाद साधला. पुष्पक यान, गरुड विमान, गगन विमान यांसारखी लहान रेडिओ नियंत्रित विमानांचे रिमोट पायलटिंग तसेच व्योमिका स्पेस अकादमी ने बनवलेले ड्रोन चे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

इस्रोचे जेष्ठ शास्त्रज्ञ टी. एन. सुरेशकुमार यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलात तरी कार्य आणि सेवा मायदेशातच करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगी, शाळेचे संस्थापक कृष्णा जी भिलारे, संचालक कुणाल भिलारे, सचिव संगीता भिलारे, शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापिका, यशस्विनी भिलारे, प्राचार्या रेणू पाटील, डॉ. पी. के. रजपूत, निवृत्त वरिष्ठ सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र रसाळ, शिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा : उन्हाळी सुट्टीत काय करायचं? हा लेख वाचा अन् करिअरला द्या दिशा

काय आहे प्रयोगशाळेत?

प्रयोगशाळेत स्पेस लॅब रॉकेट सायन्स, सॅटेलाइट, एप्लिकेशन्स ड्रोन, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, थ्रीडी प्रिंटिंग, एअरक्राफ्ट्स इत्यादीसारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर विविध प्रकारचे कार्यक्रम केले जाणार असून या पहिल्या अंतराळ प्रयोगशाळेची स्थापना व्योमिका स्पेस अकादमीचे संस्थापक गोविंद यादव यांनी इस्रोच्या स्पेस ट्यूटरच्या दृष्टीकोनातून केली आहे.

या प्रयोगशाळेत चांद्रयान 1, मंगळयान 1 उपग्रह मॉडेलसह SLV 3, ASLV, PSLV, GSLV D1, GSLV MK III, SSLV सारखे ISRO अंतराळ प्रक्षेपकांचे स्केल मॉडेल्स अभ्यासासाठी स्थापित केले आहेत.  प्रयोगशाळेत दोन दुर्बिणी बसवण्यात आल्या असून त्याद्वारे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय रोबोट किट, लाईट फॉलोइंग किट, ब्लूटूथ कंट्रोल रोबोट्स, क्वाडकॉप्टर ड्रोन इत्यादी गोष्टी प्रयोगशाळेत पाहता येतील.