बारामतीच्या विद्यार्थिनीने अनुभवला होरपळणाऱ्या मणिपुरचा थरार..   

अनेक स्थानिक नागरिकांना निर्माण झालेल्या वातावरणामुळे मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी जावे लागले. तब्बल पाच दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. इंटरनेट सह इतर सुविधा बंद होत्या.

बारामतीच्या विद्यार्थिनीने अनुभवला होरपळणाऱ्या मणिपुरचा थरार..   
Ashwagandha Parde

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतातील विविध ठिकाणाहून मणिपूरमध्ये manipur गेलेले विद्यार्थीच नाही तर मणिपूर मधील अनेक स्थानिक नागरिक सुद्धा मणिपूर सोडून आसाम (assam ) राज्यात  आश्रयासाठी  गेले होते. सुमारे चार ते पाच दिवस कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. येथे प्रचंड घबराटीचे वातावरण होते आणि परिस्थिती चिघळलेली होती,अशा वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन आम्ही कसेबसे दिवस काढले, असा थरारक अनुभव मणिपूर येथे अडकलेल्या बारामती (baramati ) येथील अश्वगंधा पारडे (Ashwagandha Parde ) या विद्यार्थिनीने 'एज्युवार्ता' ला सांगितला. 

            हिंसाचारामुळे होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अडकलेल्या महाराष्ट्रातील २५  विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. त्यातील बारामती मधील आर्या संकुल, तांबे नगर, एमआयडीसी येथील रहिवासी अश्वगंधा पारडे ही विद्यार्थिनी पुण्यात दाखल झाली आहे. तिने 'एज्युवार्ता'ला आपला थरारक अनुभव सांगितला.

     अश्वगंधा महणाली, मी पुण्यातील गरवारे कॉलेजची माजी विद्यार्थीनी आहे. सध्या नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, इंफाळ येथे स्पोर्ट्स सायकॉलॉजी या विषयाचे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण घेत आहे. माझे शिक्षण पूर्ण होत आले असून केवळ परीक्षा देणे बाकी आहे. परंतु,३ मे रोजी सायंकाळी चार-पाच वाजता मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले. मणिपूर मध्ये सर्वत्र तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यासारखी परिस्थिती नव्हती.  त्यामुळे विद्यार्थी सुद्धा विद्यापीठात अडकून पडले होते. अनेक स्थानिक नागरिकांना निर्माण झालेल्या वातावरणामुळे मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी जावे लागले. तब्बल पाच दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. इंटरनेट सह इतर सुविधा बंद होत्या. परंतु लष्कर आणि एनएसजीचे कमांडर आल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली.                      

    आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाच दिवस अत्यंत भीतीच्या वातावरणात काढले. बाहेर पडता येत नसल्याने जेवण म्हणून केवळ भात व भाजी मिळत होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासन व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूर मध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी हालचाली केल्या. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने केलेले प्रयत्न नक्कीच वाखळण्याजोगे होते.आम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते,असेही अश्वगंधा पारडे हिने सांगितले. 

 राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हा विद्यार्थ्यांची संपर्क साधला आणि आम्हाला विमानाने गुहाटी मार्गे मुंबईपर्यंत आणले. मी मंगळवारी पुण्यात सुखरूप पोहोचले.मणिपूर मधील परत घरी आल्यावर सुटकेचा निष्वास सोडला. माझे वडील डॉक्टर असून आई गृहिणी आहे. मला परत घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला. परिस्थितीत सुधारणा झाल्यावर येत्या २१ मे रोजी मला परीक्षा देण्यासाठी पुन्हा माणिपूरला जावे लागणार आहे, असेही अश्वगंधा म्हणाली.