विज्ञान, गणिताला शिक्षक आणायचे कुठून? ३ वर्षात केवळ तेराशे शिक्षक टीईटी उत्तीर्ण 

अनेक शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयासाठी चांगले शिक्षक उरले नाहीत. राज्य शासनाने २०१२ पासून शिक्षकांची भरती न केल्यामुळे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत.

विज्ञान, गणिताला शिक्षक आणायचे कुठून? ३ वर्षात केवळ तेराशे शिक्षक टीईटी उत्तीर्ण 
Teachers in Maharashtra

राहुल शिंदे

गणित (Mathematics) व विज्ञान (Science) विषयाच्या चांगल्या शिक्षकांचा (Teachers) गेल्या काही वर्षांपासून तुटवडा निर्माण झाला असून यापुढील काळातही हा तुटवडा वाढत जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून (Education Department) प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर गणित व विज्ञान विषयासाठी शिक्षक आणायची कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१८ पासून २०२१ पर्यंत केवळ १ हजार ३०७ शिक्षक गणित व विज्ञान विषय घेऊन टीईटी परीक्षा (TET Exam) उत्तीर्ण झाले आहेत.

गणित व विज्ञान हे पायाभूत विषय आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची व गणिताची गोडी लागली तर पुढे यातीलच काही विद्यार्थी संशोधन क्षेत्रात काम करतील. परंतु, अनेक शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयासाठी चांगले शिक्षक उरले नाहीत. राज्य शासनाने २०१२ पासून शिक्षकांची भरती न केल्यामुळे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचप्रमाणे डीएड अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. त्यातच कला शाखेच्या तुलनेत विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डीएड कडे मोठ्या संख्येने वळताना दिसत नाहीत. परिणामी, पुढील काळात तज्ज्ञ शिक्षकांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

NEP अंमलबजावण्यामुळे विद्यार्थ्यांचा 'MBA' प्रवेशाकडील कल वाढला

केंद्र व राज्य शासनाने शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनिवार्य केली आहे. या परीक्षेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही समोर आले होते. बनावट प्रमाणपत्र मिळवणाऱ्या हजारो शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयात टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे.

२०१८ मध्ये गणित व विज्ञान विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या १७ हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी केवळ ८११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२१ मध्ये ४० हजार ९०४ विद्यार्थ्यांपैकी २८९ विद्यार्थी तर २०२२ मध्ये ६४ हजार ६४७ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९३७ विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण झाले. या आकडेवारीवरून तज्ज्ञ शिक्षकांच्या सध्याच्या स्थितीबाबतचे चित्र स्पष्ट होते.

गणित-विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयातील पात्र विद्यार्थी

विषय वर्ष प्रविष्ट विद्यार्थी पात्र विद्यार्थी
गणित-विज्ञान २०१८ १७, ७११ ८११
सामाजिक शास्त्र २०१८ ६०,१३३ ४,६८१
गणित-विज्ञान २०१९ ४०,९०४ २८९
सामाजिक शास्त्र २०१९ १,५४,५९६ ९,८५४
गणित-विज्ञान २०२१ ६४,६४७ ९३७
सामाजिक शास्त्र २०२१ १,४९,६०४ ६,७११

मागील ३ वर्षाची डीएड अभ्यासक्रमास अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

वर्ष कला वाणिज्य विज्ञान
२०२१-२२ ६९८६   १८४८     ५४६९
२०२२-२३ ७५८४ १९५० ५५१९
२०२३-२४ ९०७५ २३१७ ७०७६

''गणित विषयाचे अध्यापन करणारे अनेक अनुभवी शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. तर काही शिक्षक लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयाचे ज्ञान घेण्याऐवजी श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांसह, मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक सुद्धा आता आपल्या मुलांना खाजगी क्लासमध्ये पाठवण्याची मानसिक निर्माण झाली आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांना खाजगी क्लासमध्ये जाणे शक्य नाही, या विद्यार्थ्यांनी कोणाकडे पाहायचे? त्यामुळे नियमित शिक्षकांची भरती होणे गरजेचे आहे. विज्ञान, गणिताचे चांगले शिक्षक उपलब्ध झाले नाही तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अडचणी येऊ शकतात.''

 - एम.एस. शहापुरे

अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय गणित परिषद, पुणे विभाग

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD