SPPU : नॅक नसलेल्या महाविद्यालयांना प्रथम वर्षास प्रवेश बंदी; कुलसचिवांनी काढले परिपत्रक

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

SPPU : नॅक नसलेल्या महाविद्यालयांना प्रथम वर्षास प्रवेश बंदी; कुलसचिवांनी काढले परिपत्रक
NAAC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅक मूल्यांकन (Naac Accreditation) करून न घेतलेल्या महाविद्यालयांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाचे प्रवेश (UG Admission) करू नयेत, असे स्पष्ट आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Dr. Prafulla Pawar) यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण संचालक (Higher Education Department) कार्यालयातर्फे २३ मे २०२३ रोजी नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाचे प्रवेश करू नयेत,असे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. या परिपत्रकानुसार विद्यापीठाने सुध्दा २५ मे रोजी संलग्न महाविद्यालयांना या संदर्भातील सूचना दिल्या होत्या. तसेच महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिये संदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाला सादर करावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु,अनेक महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यात काही महाविद्यालये कोरोनानंतर कशीबशी सावरत आहेत. 

विद्यार्थी ते कुलगुरू...३५ वर्ष विद्यापीठ अनुभवलेला संशोधक! आज पदभार स्वीकारला

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नॅक मूल्यांकनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच देशभरातील इतर राज्यांचा विचार करता महाराष्ट्र नॅक मूल्यांकनात आघाडीवर आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घ्यावे, यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. परंतु,अजूनही पुणे ,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी अजूनही नॅक मूल्यांकन करून घेतले नाही. परंतु, त्याचा परिणाम आता प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियावर होणार आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून सर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच प्रथम वर्षाचे प्रवेश नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिले जावेत, अशाही सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या. परंतु, अभ्यासक्रम तयार नसताना प्रवेश कसे द्यावेत, असा प्रश्न अनेक महाविद्यालयासमोर उभा राहिला. मात्र, बहुतांश महाविद्यालयांनी जुन्याच पद्धतीने प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना प्रवेश करता येणार नाहीत. विद्यापीठाच्या पुर्वपरवानगीशिवाय प्रवेश करू नयेत, अन्यथा संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेची राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo