ग्रंथपालांबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय; तातडीने होणार अंमलबजावणी

राज्यामध्ये पूर्णवेळ ग्रंथपालांची एकूण २ हजार ११८ मंजूर पदे आहेत. सद्यस्थितीत कार्यरत पदे साधारणपणे ९२६ असून, अर्धवेळ ग्रंथपालांच्या रुपांतरण करण्यासाठी साधारणपणे १ हजार १९२ पदे उपलब्ध आहेत.

ग्रंथपालांबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय; तातडीने होणार अंमलबजावणी
Library Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांसाठी (librarian) आनंदाची बातमी आहे. सद्यस्थितीत कार्यरत १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी रुपांतरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला (Education Department) देण्यात आले आहे. ही कार्यवाही टप्याटप्याने केली जाणार आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे रुपांतरण पूर्ण होऊपर्यंत पूर्णवेळ ग्रंथपालांची नव्याने भरती होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. (School Librarians News)

राज्यामध्ये पूर्णवेळ ग्रंथपालांची एकूण २ हजार ११८ मंजूर पदे आहेत. सद्यस्थितीत कार्यरत पदे साधारणपणे ९२६ असून, अर्धवेळ ग्रंथपालांच्या रुपांतरण करण्यासाठी साधारणपणे १ हजार १९२ पदे उपलब्ध आहेत. राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपालांचे उपलब्ध असलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालपदी रुपांतरण केले जाणार आहे. राज्यामध्ये सध्या २ हजार ते ३ हजार इतकी विद्यार्थी संख्या असलेल्या सर्वसाधारण शाळा २८० असुन त्यावर अधिक २८०च पूर्णवेळ ग्रंथपालाना कार्यभार असेल. तसेच ३ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या ५३ शाळा आहेत. त्यामध्ये १०६ पूर्णवेळ ग्रंथपालांची नियुक्ती होईल. अशा पद्धतीने एकुण ३८६ पूर्णवेळ ग्रंथपालांची नियुक्ती केली जाईल. संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

 या शाळांमध्ये उपलब्ध झालेल्या पूर्णवेळ ग्रंथपाल पदांवर प्राधान्याने अर्धवेळ ग्रंथपालांपैकी ३८६ अर्धवेळ पूर्णवेळ ग्रंथपालांचे रूपांतरण होऊ शकेल. या पदांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे रुपांतरण झाल्यानंतर राज्यातील उपलब्ध असलेल्या २ हजार ११८ पूर्णवेळ ग्रंथपालांच्या पदांच्या मर्यादेत दोन व तीन शाळा एकत्रित करुन शाळा मॅपिंग अहवालानुसार १ हजार १ विद्यार्थी संख्येचा निकष पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदांवर सर्वप्रथम उर्वरित अर्धवेळ ग्रंथपालांचे रुपातंरण केले जाईल.

या रुपांतरणासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अर्धवेळ ग्रंथपालांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पुर्णवेळ पदावर रुपातंरण केल्या जातील. रूपांतरणासाठी अर्धवेळ ग्रंथपालाची सेवा किमान ५ वर्षे पूर्ण झालेली असावी. मंजूर अर्धवेळ ग्रंथपालाच्या पदावर अर्हताप्राप्त व्यक्तीची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून नियमानुसार नियुक्ती झालेली असेल व अशा नियुक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेली असेल अशाच अर्धवेळ ग्रंथपालांचे रुपांतरण केले जाईल.

अर्धवेळ ग्रंथपाल पद हे आरक्षण धोरणानुसार भरलेले असावे. ग्रंथपालांना ग्रंथपाल पदाच्या किमान वेतन टप्यावर नियुक्ती देण्यात यावी. अर्धवेळ पदासाठी केलेली सेवा पूर्णवेळ पदावरील आगाऊ वेतनवाढीकरीता ग्राह्य धरली जाऊ नये. या कर्मचाऱ्यांना अर्धवेळ ग्रंथपालाचे पद पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून रुपांतरीत झाल्याच्या शासन निर्णयापासून वेतन व इतर लाभ दिले जातील. ते पूर्वलक्षी प्रभावाने लाभ लागू होणार नाहीत. नवीन कोणतीही पदनिर्मिती करण्यात येणार नाही किंवा रिक्त असलेल्या अर्धवेळ ग्रंथपाल/ पूर्णवेळ ग्रंथपाल पद नव्याने भरता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

------------------------

"गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवेळ ग्रंथपारांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने नियुक्त केलेल्या समितीने सुद्धा ७००  च्या वर विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेत पूर्ण वेळ ग्रंथपाल असावा ही मागणी मान्य केले होते. परंतु दोन-तीन शाळा मिळवून एक हजाराच्या वर विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांवर पूर्णवेळ ग्रंथपाल नियुक्त करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून आम्ही आभार व्यक्त करत आहोत."

- शिवाजी खांडेकर , समन्वयक संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना