विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार; घर आणि शाळेतील असेल दुवा

प्रगती पुस्तक एक सर्वांगीण, व्यापक (360 अंश), बहुजायामी अहवाल असेल व या अहवालामध्ये, शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आकलनीय (कॉग्रिटिव), भावात्मक (अफेक्टिव) आणि सायकोमोटर क्षेत्रातील प्रगती तसेच विशेषता अतिशय तपशीलवारपणे दर्शवली जाईल.

विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार; घर आणि शाळेतील असेल दुवा
NEP 2020 Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळेच्या निकालाच्या (School Result) दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतिक्षा असते ती प्रगती पुस्तकाची (Progress Report). त्यावर प्रत्येक विषयांच्या गुणांसह पास की नापासाचा शिक्का आहे, हे पाहून मुलांच्या प्रगतीचा आलेख जोखला जातो. मागील काही वर्षात हा ट्रेंड बदलत असला तरी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) प्रगती पुस्तकात आमुलाग्र बदल होणार आहे. हे प्रगती पुस्तक व्यापक म्हणजेच मुलाच्या सर्वांगीण प्रगतीचा ३६० अंशात आढावा घेणार असेल. अभ्यासात घोकंपट्टीवर भर न देता मुलभूत अध्ययनावर (Teaching) भर दिला जाणार आहे.

नव्या धोरणामध्ये प्रगती पुस्तकामध्ये अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. आपल्या शालेय व्यवस्थेमधील मूल्यमापन, सारांश (समेटीव्ह) पध्दतीचे आहे जे मुख्यत्वे घोकंपट्टी करून लक्षात ठेवण्याच्या कौशल्याची पारख करते. या मूल्यमापनाच्या उद्दिष्टात बदल करून ते अधिक नियमित आणि रचनात्मक (फॉर्मेटीक) केले जाईल, क्षमतेवर आधारित असेल, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि विकासाला प्रोत्साहन देणारे आणि उच्च-स्तरावरील कौशल्ये उदा. विश्लेषण, तार्किक विचार आणि संकल्पनात्मक सुस्पष्टता, यांची पारख करणारे असेल, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : MHT CET 2023 : मंगळवारपासून परीक्षा सुरू; ही घ्या काळजी नाहीतर परीक्षेला मुकाल!

शाळेकडून पालकांना कळवल्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा-आधारित मूल्यमापनाच्या प्रगती पुस्तकाची संपूर्ण पुनर्रचना राज्य/केंद्रशासित प्रदेशांतर्फे प्रस्तावित राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र, NCERT आणि SCERT यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. हे प्रगती पुस्तक एक सर्वांगीण, व्यापक (360 अंश), बहुजायामी अहवाल असेल व या अहवालामध्ये, शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आकलनीय (कॉग्रिटिव), भावात्मक (अफेक्टिव) आणि सायकोमोटर क्षेत्रातील प्रगती तसेच विशेषता अतिशय तपशीलवारपणे दर्शवली जाईल. यामध्ये शिक्षकाच्या मूल्यमापनासह स्व-मूल्यमापन, सहाध्यायी-मूल्यमापन तसेच प्रकल्प आणि अन्वेषणावर आधारित अध्ययन, प्रश्नमंजुषा, नाटयीकरण, सांघिक कार्य, पोर्टफोलिओज इ. मध्ये विद्याथ्यति केलेली प्रगती या सर्वांचा समावेश असेल, असे धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वांगीण प्रगती पुस्तक हे घर आणि शाळा यातील महत्त्वाचा दुवा असेल आणि त्याच्या जोडीने पालक-शिक्षक बैठकादेखील घेतल्या जातील जेणेकरून पालकांना आपल्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणामध्ये आणि विकासामध्ये सक्रियपणे सहभागी करून घेता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आणि वर्गाच्या बाहेर कशा प्रकारे मदत करावी याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती पालक आणि शिक्षकांना देण्याचे काम प्रगती पुस्तकाच्या माध्यमातून साध्य होईल.

हेही वाचा : आरटीई मान्यतेशिवाय चालणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग मेहेरबान?

AI तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअर विकसित करता येईल जे अध्यापनाचा डेटा/माहिती आणि पालक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या परस्परसंवादी प्रश्नावलींवर आधारित असेल आणि, त्याचा वापर करून शालेय वर्षांमध्ये होणाऱ्या स्वतःच्या विकासावर विद्यार्थ्यांना लक्ष ठेवता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कुवत, आवडीची क्षेत्रे आणि लक्ष केंद्रित करायची गरज असलेली क्षेत्रे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. या माहितीचा वापर करून त्यांना स्वत:साठी करिअरचे सर्वोत्कृष्ट पर्याय निवडायला मदत होईल, असेही धोरणात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2