चूक समाजकल्याणची अन् शिक्षा विद्यार्थ्यांना: शिष्यवृत्तीचा हप्ता न मिळाल्याने महाविद्यालयांकडून अडवणूक
समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना (Students) समाजकल्याण विभागाकडून (Social Justice Drpartment) पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप (Post Matric Scholarship) देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता जमा न झाल्याने काही महाविद्यालये विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याचे समोर आले आहे. परीक्षा अर्ज घेण्यास या महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रारी विद्यार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे (Prashant Narnaware) यांच्याकडे केली आहे.
समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाते. त्याअंतर्गत काही महाविद्यालयांना पहिला हप्ता मिळालेला आहे. पण महाविद्यालयांना दुसरा हप्ता न मिळाल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. शासनाकडून यापूर्वीची थकबाकी मिळत नसल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज घेतले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा : विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार; घर आणि शाळेतील असेल दुवा
युवक क्रांती दलाकडून याबाबत समाजकल्याण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. संपूर्ण शुल्क भरा तरच परीक्षा अर्ज घेऊ, अशी भूमिका तळेगाव येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने घेतली आहे. त्यामुळे अचानक एवढे पैसे कुठून भरायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. महाविद्यालये विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाल्याचे युक्रांदने म्हटले आहे.
हेही वाचा : आरटीई मान्यतेशिवाय चालणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग मेहेरबान?
समाजकल्याण विभागाने महाविद्यालयाला सांगून देखील महाविद्यालय आडमुठी भूमिका घेताना दिसत आहे. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप तात्काळ जमा करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने सोमवारी समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली. यावेळी युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, कार्यकारिणी सदस्य अजय नेमाने व विद्यार्थी उपस्थित होते.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.