विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग; विविध करारांवर शिक्कामोर्तब

कौशल्य विद्यापीठाअंतर्गत पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग; विविध करारांवर शिक्कामोर्तब
Sealing of various agreements

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत (Skill University) १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग (On job training) आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली.

लोढा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. यावेळी  कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, यासह सॅप इंडिया, रेडहंट, मायक्रोसॉफ्ट, सेर्टी पोर्ट, एमईडीसी, मॅक, एनआरएआय, संचेती, सीएसडीसीआय यासह विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : अधिसभा सदस्यांनाच मिळत नाही अधिकृत माहिती

कौशल्य विद्यापीठाअंतर्गत पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याच माध्यमातून अनेक उद्योगसमूहाशी सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाच्या शिक्षणातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी या सर्व उद्योगसमूहांचे सहकार्य मिळेल, असे लोढा यांनी सांगितले.

मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित करून देशात आणि परदेशातही उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळतील. डिजिटल व्हिडिओ प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकवणे यातून कौशल्ययुक्त विद्यार्थी घडण्यास मदत होणार असल्याने, या सर्व उद्योगसमूहांचे लोढा यांनी आभार मानले.

सुजाता सौनिक म्हणाल्या की, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. शिक्षण घेणारा तरुण हा कौशल्ययुक्त असावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आरोग्य, हॉटेल, औद्योगिक क्षेत्र, आयटी क्षेत्र यामध्ये उच्च तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन शासनाने आज विविध बारा उद्योग समूहांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य कराराच्या उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी मदत होईल.