11th Admission : दुसऱ्या फेरीसाठी तब्बल साडे पाच हजार विद्यार्थी अपात्र, चूक पडली महागात

पहिल्या फेरीमध्ये एकूण ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २३ हजार ४१५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत.

11th Admission : दुसऱ्या फेरीसाठी तब्बल साडे पाच हजार विद्यार्थी अपात्र, चूक पडली महागात
11th Admission Process

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता अकरावीची (11th Admission Process) पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून (Education Department) दुसऱ्या नियमित फेरीची प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारपासून या फेरीसाठी ऑनलाईन पसंतीक्रम भरण्यास सुरूवात झाली आहे. पुणे (Pune) व पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) या फेरीमध्ये साडे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यांना या फेरीत सहभागी होता येणार नसून थेट तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

शिक्षण विभागाकडून सोमवारी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या फेरीमध्ये एकूण ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २३ हजार ४१५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. तर १८ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यातील ५ हजार ४४९ विद्यार्थी हे पहिल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले आहेत.

11th Admission : अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर, अर्ज भरण्यास सुरूवात

पहिल्या फेरीत ६६ विद्यार्थ्यांना विविध कारणांनी प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर १६६ विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश रद्द केला आहे. या विद्यार्थ्यांसह पहिल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या ५ हजार ५८२ विद्यार्थ्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत एकूण प्रवेश क्षमतेच्या केवळ ३३ टक्के प्रवेश झाले आहेत.

पहिल्या फेरीनंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रवेशाची स्थिती (अधिकृत संकेतस्थळावरील माहिती) –

एकूण महाविद्यालये - ३२६

कॅपअंतर्गत प्रवेश क्षमता – ८९ हजार १७४

झालेले प्रवेश – २३ हजार ४१५

रिक्त जागा – ६५ हजार ७५९

कोटाअंतर्गत प्रवेश क्षमता – २४ हजार ८१६

झालेले प्रवेश – ३ हजार ८४०

रिक्त जागा – २० हजार ९७६

एकूण प्रवेश क्षमता – १ लाख १३ हजार ९९०

एकूण प्रवेश – २७ हजार २५५

एकूण रिक्त – ८६ हजार ७३५

पहिल्या फेरीत निवड झालेले – ४२ हजार २३९

प्रवेश घेतलेले – २३ हजार ४१५

प्रवेश न घेतलेले व इतर – १८ हजार ८२४

पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेले – २३ हजार ३५१

प्रवेश न घेतलेले – ५ हजार ४४९

दुसऱ्या फेरीसाठी प्रतिबंधित विद्यार्थी – ५ हजार ५८२

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2