11th Admission : अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर, अर्ज भरण्यास सुरूवात

अकरावीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी (दि. २६) पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. अद्यापही भाग एक न भरलेल्या विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ जुलै या कालावधीत नोंदणी करून भाग एक भरता येणार आहे.

11th Admission : अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर, अर्ज भरण्यास सुरूवात
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण विभागाकडून (Education Department) इयत्ता अकरावीच्या दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक (11th Admission Timetable) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आजपासूनच (दि. २७) अर्जाच्या भाग एक मध्य दुरुस्ती करण्यासह पसंतीक्रम अर्ज भाग दोन ऑनलाईन भरता येणार आहे. या फेरीची निवड यादी ३ जुलैला प्रसिध्द केली जाणार आहे. कोटांतर्गत प्रवेशाची (Quota Admission) दुसरी फेरीही सुरू झाली आहे. (11th Admission Process second round)

राज्यात पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक व अमरावती या शहरांसाठी शिक्षण विभागाकडून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्याअंतर्गत अकरावीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी (दि. २६) पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. अद्यापही भाग एक न भरलेल्या विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ जुलै या कालावधीत नोंदणी करून भाग एक भरता येणार आहे. मात्र या कालावधीत भाग एक अनलॉक किंवा दुरूस्ती करता येणार नाही. या फेरीतही प्रथम पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक असेल. अन्यथा संबंधित विद्यार्थ्याला पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; आमदार रविंद्र धंगेकर यांनी 'आरटीओ'ला ठणकावले

विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा असल्यास त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश करू शकतात. मात्र असे विद्यार्थीही पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील. तर एखाद्या विद्यार्थ्याला पहिला पसंतीक्रम वगळून इतर पसंतीक्रमानुसार अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेऱ्यांसाठी थांबू शकतो.

या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येतील अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील. प्रवेश घेतलेले तसेच पहिल्या फेरीमध्ये प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले तसेच प्रवेश रद्द केलेले विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही.

खासगी विद्यापीठांमध्ये शुल्क सवलतीची अंमलबजावणी कधी? विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याच्या तक्रारी

दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक –

दि. २७ ते २९ जून - १. प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, म्हणजे नियमित फेरी-२ साठी पसंती अर्ज भाग-२ ऑनलाईन सादर करणे. विद्यार्थ्यांना भाग-२ मध्ये किमान एक व कमाल १० पसंतीक्रम / विद्यालये नोंदविता येतील.

२. नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करुन अर्ज भाग-१ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात.

३. विद्यार्थ्यांना त्यांचा भाग-१ मध्ये दुरुस्ती करता येईल, फक्त अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य राहील.

टीप १ - केवळ भाग १ पडताळणी झालेले विद्यार्थी भाग-२ भरू शकतात.

टीप २ - फक्त पसंतीक्रम भाग-२ लॉक असलेले अर्ज अलॉटमेंटसाठी विचारात घेतले जातील.

दि. ३० जून ते २ जुलै - DATA PROCESSING (back-end activities). पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे तसेच विभागीय CAP समित्यांकडून Allotment चे पूर्व परीक्षण.

दि. ३ जुलै - १. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय निवड यादी / तपशील पोर्टलवर प्रदर्शित करणे.

२. विद्यार्थी लॉगीन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे.

३. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे.

४. फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश / SMS देणे)

दि. ३ ते ५ जुलै - १. कॉलेज लॉगीन मध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरु राहतील.

२. अलॉट झालेल्या महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करणे, (प्रवेशास जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे).

३. अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास, प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करुन आपला प्रवेश तेथे निश्चित करावा

४. जर अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील

दि. ५ जुलै - प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ. उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा CAP कडे प्रत्यापित करण्यासाठी वेळ (व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटा). पुढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे. (कॅप व कोटांतर्गत रिक्त जागांचा समावेश असेल.)

 

कोटाअंतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक -

दि. २७ ते २९ जून - १. कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणेची सुविधा (Apply for quota) (व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा)

(जे विद्यार्थी कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांनी विद्यार्थी लॉगिनमध्ये कोटपासाठी ऑनलाईन Apply करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना लॉगीनमध्ये संबंधित विद्यालयामध्ये कोट्यातून प्रवेशासाठी आपली पसंती नोंदविता येईल)

२. कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन आणि इन-हाऊस कोट्यांतील रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित करता येतील.

दि. ३० जून ते २ जुलै - विद्यालयांनी कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्याची कोटावार गुणवत्ता यादी नियमानुसार तयार करणे.

दि. ३ जुलै - प्रवेशासाठी पात्र / निवडलेले आणि प्रतीक्षेतील विद्याथ्यांची यादी विद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे, निवडलेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी फोन करणे, संदेश देणे. (विद्यालय स्तरावरील कार्यवाही)

दि. ३ ते ५ जुलै - १. या कालावधीत (व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्याक) कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जातील.

२. कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार आपला प्रवेश निश्चित करणे.

३. पात्र व पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांच्या कोटानिहाय याद्या विद्यालयात प्रदर्शित केल्या जातील. कनिष्ठ महाविद्यालये त्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांना व त्यांचे संमतीने संबंधित कोट्यातून गुणवत्तेनुसार प्रवेश देऊ शकतात.

दि. ५ जुलै - प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ. उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील जागा समर्पित करण्यासाठी वेळ. (व्यवस्थापन कोटा आणि इनहाऊस कोटा)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2