PMC Schools : आमदार माधुरी मिसाळ यांनी शाळांच्या दुरावस्थेचे विधानसभेत काढले वाभाडे

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या माध्यमातून मिसाळ यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

PMC Schools : आमदार माधुरी मिसाळ यांनी शाळांच्या दुरावस्थेचे विधानसभेत काढले वाभाडे
MLA Madhuri Misal

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांच्या (PMC Schools) दुरावस्थेचे आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) वाभाडे काढले. कंत्राटी शिक्षकांची (Teachers) अनुपस्थिती, स्वच्छतागृहांची दुरावस्था, सुरक्षारक्षक नसणे, मुलींचे आरोग्य असे विविध मुद्दे त्यांनी उपस्थित करत या शाळांना अचानक भेट देण्याची विनंती शालेय शिक्षण मंत्र्यांना (School Education Minister) केली.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या मुद्द्यावर लक्षवेधीच्या माध्यमातून मिसाळ यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मिसाळ म्हणाल्या, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील शाळांमधील स्थिती अत्यंत दयनीय आहे. माझ्या मतदारसंघातील शाळांचीही दुरावस्था आहे. कित्येक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना कुठल्यातरी संस्थेला कंत्राट देऊन त्यांचे शिक्षक शिकवायला येतात. याच संस्थांचे मुख्याध्यापकही आहेत. शाळेत सफाई कर्मचारी नाहीत, सुरक्षारक्षक नाहीत.

NCC च्या विद्यार्थ्यांना ट्रेनरकडून अमानुष मारहाण; सोशल मीडियात ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल

वर्गात शिक्षक कसे शिकवतात, असा प्रश्न पडतो. मुले व मुलींसाठी एकच स्वच्छतागृह असून दयनीय अवस्था आहे. मुलींना तिथे जाणेही शक्य नाही. शाळेचे मैदान खासगी संस्थांना चालवायला दिले आहे. शाळेतील मुलेच तिथे जाऊ शकत नाहीत. अत्यंत दयनीय स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे, असा संताप आमदार मिसाळ यांनी व्यक्त केला. तसेच या शाळांना मंत्र्यांनी अचानक भेट देऊन पाहणी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. आठवी ते दहावीच्या शाळांना राज्य शासनाची मान्यता घेतली जात नसल्याचा मुद्दाही मिसाळ यांनी उपस्थित केला.

शिक्षण विभागाच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. शाळांना अचानक भेट देण्याची विनंती त्यांनी मान्य केली. ते म्हणाले, हे मुद्दे गंभीर आहेत. शाळांना अचानक भेट दिली जाईल. जाणीवपूर्वक मुले व मुलांच्या स्वच्छतागृहांमध्ये दुर्लक्ष कोणी करत असेल तर कारवाई केली जाईल. पालिकेच्या शाळांमध्ये २ हजार ४२५ शिक्षकांना मान्यता दिली असून ३५२ जागा रिक्त आहेत. उच्च न्यायालयात भरतीला स्थगिती होती. आता शालेय शिक्षण विभागाने ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर शिक्षकांचा प्रश्न मिटेल. २६ माध्यमिक शाळा असून कार्यरत फक्त ७५ शिक्षक आहेत. नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल. मान्यतेशिवाय शाळा चालत असतील तर त्यांना जबाबदार धरले जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD