शिष्यवृत्तीसाठी फुलेवाडा ते विधान भवन लॉंगमार्च; बार्टी, सारथी, महाज्योतीचे विद्यार्थी आक्रमक

राज्यभरातील संशोधन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी एल्गार करत 24 जून ते 2 जुलै या कालावधीत पुण्यातील महात्मा फुलेवाडा ते मुंबईतील विधानभावनापर्यंत पायी लॉंगमार्च (Long March)काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शिष्यवृत्तीसाठी फुलेवाडा ते  विधान भवन लॉंगमार्च; बार्टी, सारथी, महाज्योतीचे विद्यार्थी आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती (Barti, Sarthi, Mahajyoti) या संस्थांच्या कामकाजात एकसमानता आणण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित (Students deprived of scholarship)आहेत.त्यामुळे राज्यभरातील संशोधन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी एल्गार करत 24 जून ते 2 जुलै या कालावधीत पुण्यातील महात्मा फुलेवाडा ते मुंबईतील विधानभावनापर्यंत (Mahatma Phulewada to Vidhan Bhawan)पायी लॉंगमार्च (Long March)काढण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील विद्यार्थ्यांनी या लॉंगमार्चमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन संशोधक विद्यार्थ्यांनी केले आहे.

राज्य शासनातर्फे बार्टी,सारथी, महाज्योती आदी संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.विद्यार्थ्यांना (Ph.D students)शिष्यवृत्ती दिली जाते.परंतु, शासनाने अध्यादेश प्रसिद्ध करून त्यावर निर्बंध आणले.कोणतीही कल्पना न देता अचानक शासनाने शिष्यवृत्ती बंद केली,असा आरोप सातत्याने विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.तसेच विरोधकांनी सुध्दा यावर विधान सभेत आवाज उठवला.मात्र,शासनाने अद्याप या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही.त्यामुळेच दलित भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी व मराठा विद्यार्थ्यांचा एकत्रित पायी लॉंगमार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यात 30 ऑक्टोबर रोजीचा अध्यादेश रद्द करावा, दीड वर्षांपासून रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ द्यावी,आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे,असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. 

-------------------------------------

गेल्या दीड वर्षांपासून सारथी संस्थेने मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून त्यांना शिष्यवृत्ती दिली नाही.शासनाने सर्व संस्थांमध्ये एक समानता आणण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.त्यामुळेच फुलेवाडा ते विधान भवन मोर्चा काढला जाणार आहे. 

- तुकाराम शिंदे, विद्यार्थी समन्वयक, सारथी संस्था 
----------------------------------
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांनीही स्त्री शिक्षणासाठी काम केले.प्रत्येक घटकांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचे काम केले.त्यामुळे फुलेवाडा येथून लॉगमार्चला सुरूवात केली जाणार आहे.राज्यभरातील सुमारे 3 हजारांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या हक्कापासून वंचित आहेत.त्यातील एक हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी होतील,असही आमची अपेक्षा आहे.वेळेवेळी संबंधित संस्थांच्या समोर उपोषण व आंदोलन करूनही प्रश्न मार्गी लागत नाही.त्यामुळे 24 जून पासून 2 जुलैपर्यंत पायी लॉंगमार्च काढला जाणार आहे. 

- प्रवीण गायकवाड, विद्यार्थी समन्वयक , बार्टी संस्था ,

---------------------------------------------------

महाज्योती संस्थेचे सुमारे 200 विद्यार्थी या लॉंगमार्चमध्ये सहभागी होणार आहेत. 2022-23 या शैक्षणिक वर्षातील पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्यावी, या प्रमुख मागणीसाठी हा लॉंगमार्च काढला जाणार आहे.शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, यासाठी सर्वांनी एकत्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 संदीप आखाडे, विद्यार्थी समन्वयक, महाज्योती संस्था