NEET पेपर लीक प्रकरणात मोठा खुलासा; बिहार पोलिसांना मिळाले ६ पोस्ट-डेटेड चेक

पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेपूर्वी उमेदवारांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या गुन्हेगारांच्या नावे असणारे सहा पोस्ट-डेटड चेक जप्त केले आहेत.

NEET पेपर लीक प्रकरणात मोठा खुलासा; बिहार पोलिसांना मिळाले ६ पोस्ट-डेटेड चेक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नीट पेपर लीक प्रकरणात बिहार पोलिसांना (Bihar Police) मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स युनिट (EOU) ने ६ पोस्ट-डेटेड चेक (Post-dated cheque) जप्त केले आहेत. हे चेक मागच्या महिन्यात झालेल्या नीटच्या कथितपणे पेपर लीक प्रकरणात देण्यात आले होते. प्रत्येक उमेदवाराकडून ३० लाखांपेक्षा जास्त रुपयांची मागणी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

"तपासादरम्यान, EOU अधिकाऱ्यांनी परीक्षेपूर्वी उमेदवारांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या गुन्हेगारांच्या नावे असणारे सहा पोस्ट-डेटड चेक जप्त केले आहेत. याशिवाय आम्ही संबंधित बँकांकडून खातेदारांची माहिती गोळा करत आहोत,असे उपमहानिरीक्षक (EOU) मानवजीत सिंग ढिल्लन म्हटले आहे.

कथित NEET-UG 2024 प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात EOU ने आतापर्यंत चार उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह १३ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपी बिहारचे असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. EOU ने नऊ उमेदवारांना त्यातील सात बिहारमधील आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक यांना तपासात सहभागी होण्यासाठी नोटिसाही बजावल्या आहेत.

"परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणाऱ्यांना त्यांच्या पालकांनी प्रति उमेदवार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे दिल्याचे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या उमेदवारांनी मान्य केले आहे. तपासादरम्यान व्यवहारांचे पुरावेही सापडले आहेत आणि सहा पोस्ट-डेटेड चेक जप्त करण्यात आले आहेत. EOU अधिकाऱ्यांनी सेफ हाऊसमधून अर्धवट जळलेल्या प्रश्नपत्रिकाही जप्त केल्या आहेत. आम्ही NTA कडून NEET प्रश्नपत्रिका मागवल्या आहेत. त्यावर अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही, अशीही माहिती ढिल्लन यांनी दिली.

दरम्यान, NTA च्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "एनटीएचे उच्चपदस्थ अधिकारी जरी दोषी आढळले तरी त्यांना सोडले जाणार नाही. एनटीएमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारला याची काळजी आहे, कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा होईल."