वरूण सरदेसाईंनी पुणे विद्यापीठात फुंकले रणशिंग
मागील काही महिन्यांतील राजकीय घडामोडीनंतर सरदेसाई यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पुणे विद्यापीठात हजेरी लावली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) शिवसेनेच्या (Shiv Sena) उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांच्याकडून तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी ठिकठिकाणी दौरे केले जात आहेत. त्यामुळे त्यांचा पुण्याचा दौराही चर्चेचा विषय बनला आहे. (Varun Sardesai Latest News)
मागील काही महिन्यांतील राजकीय घडामोडीनंतर सरदेसाई यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पुणे विद्यापीठात हजेरी लावली. त्यामुळे या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले होते. विद्यापीठात सुरूवातीला त्यांनी विद्यार्थी शिष्यमंडळासोबत कुलगुरूंची भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेली समान संधी केंद्र योजना विद्यापीठात सुरु करावी, अशा जवळपास दहा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.
या भेटीनंतर सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर आपण प्रयत्न करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी चळवळीतील प्रतिनिधी कुलदीप आंबेकर, राहुल ससाने, नारायण चापके, विशाखा भालेराव, श्रद्धा भोसले, सुजाता मोराळे, गजानन अडबलवार, तुकाराम शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/
दरम्यान, कुलगुरूंकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये विद्यापीठ व कॉलेज स्तरावर प्लेसमेंट अधिकारी नेमणे तसेच या माध्यामातुन जास्तित जास्त विद्यार्थी रोजगारक्षम, व्यावसाभिमुख करणे, विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थीला वसहतीगृह देण्यात यावे, कमवा व शिका योजनांच्या रक्कमेत वाढ करावी. तसेच ज्या विद्यार्थीला गरज आहे त्यांना सरसकट योजनेचा लाभ द्यावा, विद्यार्थीनींसाठी रात्री कँम्पस बाहेर गेल्यावर येण्यास बससेवा सुरु करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे विद्यापीठ कँम्पस मध्ये मेडीकल सुविधा २४ तास उपलब्ध करावी, सिनेट निवडणुकीवेळी दोन केंद्रावर गैरप्रकार झाले, त्यांच्यावर बंदी घालावी, नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शुल्कवाढ कमी करण्यात यावी, नवीन शैक्षणिक धोरण याबाबत विद्यार्थीमध्ये जनजागृती अभियान राबवावे आणि आपत्तीग्रस्त, गारपीट झालेल्या संकटामुळे परीक्षा शुल्क माफ करावे, या महत्वाच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.