PMC School : शाळा की गुन्हेगारी अड्डा; वर्ग सुरू असताना दारूच्या पार्ट्या, गांजा, खुनी हल्ले... 

पालिकेच्या बोपोडी येथील शाळेत दिवसाढवळ्या वर्ग सुरु असताना काही तरुण दारू आणि गांजा ओढत असल्याचा व्हिडिओ 'एज्युवार्ता' च्या हाती लागला आहे.

PMC School : शाळा की गुन्हेगारी अड्डा; वर्ग सुरू असताना दारूच्या पार्ट्या,  गांजा, खुनी हल्ले... 
PMC School

दीपा पिल्ले पुष्पकांथन

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात शाळांची दुरावस्था हा विषय अनेकवेळा चर्चेला आला आहे. पण आता पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्याहून भयानक परिस्थिती असल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या बोपोडी येथील शाळेत दिवसाढवळ्या वर्ग सुरु असताना काही तरुण दारू आणि गांजा ओढत असल्याचा व्हिडिओ 'एज्युवार्ता' च्या हाती लागला आहे. कळस म्हणजे दोन दिवसांपूर्वी  रात्री या शाळेत दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला. विद्येच्या माहेरघरात ही शाळा गुन्हेगारी अड्डा बनल्याने पुणेकरांसाठी शरमेची बाब आहे. शाळेसह पालिका प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

बोपोडी येथे पालिकेच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला या शाळेच्या आवारात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, पुणे महानगरपालिकेची उर्दू माध्यमाची शाळा आणि 'अनंतराव पवार मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कुल' अशा तीन शाळा चालवल्या जातात. वास्तविक पाहता शाळेच्या १०० मीटर परिसरापर्यंत अंमली पदार्थांच्या विक्रीला सुद्धा मनाई आहे, पण या शाळेलाच जणू दारूचा अड्डा बनवण्यात आला असल्याचे चित्र शाळेत सगळीकडे दिसते.  शाळेच्या आवारात प्रवेश करताच तिथली भयानकता लक्षात येते.

हेही वाचा : शिक्षण विभाग नक्की कुणावर मेहेरबान?

शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झाडीत दिवसा ढवळ्या तळीरामांचा मेळा भरतो. विशेष म्हणजे यावेळी वर्गात विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात. प्रवेश द्वाराजवळ मोठे  बोधचिन्ह लावण्यात आले आहे. या स्तंभाच्या मागील बाजूस आणि आसपासच्या परिसर दारूच्या बाटल्या, गुटखा, तंबाखूच्या पुड्या, जुगाराचे पत्ते पडलेले दिसतात. अगदी लहान वयातील मुलेही सिगारेट ओढताना दिसतात. दारू आणि सिगारेट पिणाऱ्या या मुलांचा आणि त्या शाळेचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट जाणवते. हे तरुण दारू आणि सिगारेट पिण्यासाठी शाळेच्या परिसराचा वापर करत आहेत, ही बाब एज्युवार्ता च्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होते. 

परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गायकवाड यांनी या प्रकरणाविषयी 'एज्युवार्ता' शी बोलताना माहिती दिली. गायकवाड  म्हणाल्या, " मागील दीड-दोन वर्षांपासून शाळेच्या आवारात हा प्रकार सुरु आहे. सुरुवातीला जेव्हा स्थानिक नागरिकांनी या विषयी मला सांगितले, तेव्हा मी स्वतः शाळेची पाहणी केली. त्यावेळी मला शाळेच्या कॅम्पसमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच, सिगारेटचे तुकडे, तंबाखूच्या पुड्या सापडल्या. पुढे मी नियमितपणे त्या शाळेत जाऊ लागले. नंतर दुपारच्या वेळेत वर्ग सुरु असताना किंवा संध्याकाळी त्या ठिकाणी मुले राजरोसपणे दारू पिताना किंवा गांजा ओढताना दिसतात.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

स्थानिक नागरिक वारंवार या विषयी तक्रार करत आहेत. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. शाळा प्रशासनानेही वारंवार या विषयी पोलिसांत आणि पालिकेत तक्रार केली आहे, पण त्याचीही दखल घेतली गेलेली नाही. या शाळेच्या गेटवर वॉचमन नाही. ही मुले गुंडप्रवृत्तीची असल्यामुळे स्थानिक आणि शाळेतील शिक्षक यांना घाबरतात. पुणे महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे, वेळोवेळी या ठिकाणी गस्त घातली पाहिजे तेव्हाच या प्रकरणाला आळा बसेल, अशी अपेक्षा वैशाली गायकवाड यांनी व्यक्त केली.