स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये सुध्दा आरटीईतून प्रवेश ? यंदा 75 हजार शाळांमध्ये आरटीईच्या 9 लाखाहून अधिक जागा

यंदा 75 हजार 39 शाळांनी नोंदणी केली असून या वर्षी 9 लाख 61 हजार 668 एवढ्या जागांवर आरटीईतून प्रवेश दिला जाणार आहे.

स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये सुध्दा आरटीईतून प्रवेश ? यंदा 75 हजार शाळांमध्ये आरटीईच्या 9 लाखाहून अधिक जागा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

RTE Admission: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत(आरटीई) 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी (RTE Admission Process)यंदा 75 हजार 39 शाळांनी नोंदणी केली असून या वर्षी 9 लाख 61 हजार 668 एवढ्या जागांवर आरटीईतून प्रवेश दिला जाणार आहे.त्यातही आरटीई कायद्यात बदल (Changes in RTE Act) झाला असला तरीही स्वयंअर्थसहाय्यीत शाळेतही आरटीईतून प्रवेश (Admission through RTE even in self-financed schools) झाले पाहिजेत,अशी शालेय शिक्षण विभागाची भूमिका (Role of School Education Department)असून या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.येत्या आठवड्याभरात या संदर्भातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे,असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीईच्या 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून आरटीई कायद्यात झालेल्या बादलानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून शासनाने शासकीय व अनुदानित शाळा सुध्दा आरटीईच्या कक्षेत आणल्या आहेत. अल्पसंख्यांक शाळा, निवासी शाळा आणि अंशत:अनुदानित शाळा वगळून सर्व शाळांची नोंदणी करण्यात आली आहे.त्यामुळे यंदा 75 हजार 39 शाळांमधील 9 लाख 61 हजार 668 जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत.मागील वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या आठ हजार शाळांचा समावेश या वर्षी राबवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला आहे. 

हेही वाचा : पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळांमध्ये 327 जागांवर शिक्षक भरती ; 1 एप्रिलपासून अर्ज करता येणार

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी संकलित झालेला शाळा नोंदणी डेटा पुढील प्रक्रियेसाठी एनआयसीकडे पाठविला जाणार आहे.त्यानंतर विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.परंतु,विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्याची संधी कोणत्या पध्दतीने द्यावी, या संदर्भात शिक्षण विभागाने शासनाकडे अभिप्राय मागितला आहे.त्यातच पसंतीक्रम नोंदणीचा प्रस्ताव सादर करताना विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये सुध्दा प्रवेश मिळू शकेल,असा विचार शिक्षण विभागाने केला आहे.मात्र,त्यास शासनाकडून मंजूरी दिली जाणार की नाही, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे,असेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 4 हजार 986 शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली असून एकट्या पुणे जिल्ह्यात आरटीईच्या 74 हजार 24 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. पुण्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 4 हजार 52 शाळांनी नोंदणी केली असून येथे 51 हजार 338 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तर नाशिक शाळा नोंदणीत तिसऱ्या क्रमांकावर असले तरी येथे 60 हजार 296 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.अहमदनगर जिल्हयापेक्षा शाळा नोंदणी कमी असली तरी नाशिक जिल्ह्यातील आरटीई प्रवेश क्षमता अधिक आहे.