वारे गुरूजी आता चप्पल घालणार का? आरोप झाल्यापासून फिरतात अनवाणी

वारे गुरूजींनी लोकसहभागातून वाबळेवाडी गावची जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविली. त्यांच्या या कामाचे सर्वदूर कौतूक झाले.

वारे गुरूजी आता चप्पल घालणार का? आरोप झाल्यापासून फिरतात अनवाणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (ZP school Wablewadi) अनियमितता केल्याच्या आरोपांमधून दत्तात्रय वारे गुरूजी (Dattatray Ware Guruji) यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. सत्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या निर्णयानंतर दिली आहे. मात्र, आरोपांनंतर व्यथित झालेल्या वारे गुरूजींनी चप्पल घालणे सोडून दिले होते. आजही ते अनवाणीच फिरतात. आता अग्निपरीक्षा पार केल्यानंतर तरी ते चप्पल घालणार का, याबाबत शिक्षण क्षेत्रात उत्सुकता आहे. याबाबतचा निर्णय त्यांनी वाबळेवाडीकरांवर सोडला आहे.

 

वारे गुरूजींनी लोकसहभागातून वाबळेवाडी गावची जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविली. त्यांच्या या कामाचे सर्वदूर कौतूक झाले. राज्य शासनासह केंदानेही त्यांचा सन्मान केला. कौतूकाचा वर्षाव होत असतानाच त्यांच्यावर अनियमिततेचे आरोप झाले. हे आरोप आदर्श शिक्षक असलेल्या वारे गुरुजींच्या चांगलेच जिव्हारी लागले. तेव्हापासून त्यांनी चप्पल घालणे सोडून दिले. जालिंदरनगर येथील शाळेत बदली झाल्यानंतरही वारे गुरूजी अनवाणीच फिरत आहेत.

वारे गुरूजी यांची निर्दोष मुक्तता ; अखेर सत्याचा विजय

 

शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी डोनेशन घेतला जात असल्याचा आरोप वारे गुरुजींवर ठेवण्यात आला होता. कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणे व कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग करणे, शालेय प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता व निष्काळजीपणा करणे, महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा वर्तवणूक नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. या आरोपांमधून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

या विजयानंतर आता वारे गुरूजी पुन्हा चप्पल घालणार का, याबाबत वाबळेवाडीसह शिक्षण क्षेत्रातही उत्सुकता आहे. याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना वारे गुरुजी म्हणाले, माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे वाबळेवाडीसह तेथील शाळा, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना खो बसला. त्यामुळे आता मी चप्पल घालायची की नाही, याचा निर्णय वाबळेवाडीकरच घेतील.

 

दरम्यान, दत्तात्रय वारे गुरुजी यांची विभागीय चौकशी झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सुद्धा विभागीय चौकशी अहवालाशी सहमती दाखवून दत्तात्रय वारे यांना दोष मुक्त केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j