राज्यातील २२ विद्यापीठांतून पुण्यात येणार ‘अमृत कलश’; जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपुर्द करणार

महाराष्ट्रात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र, आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने हे अभियान हजारो विद्यार्थ्यांमार्फत महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे.

राज्यातील २२ विद्यापीठांतून पुण्यात येणार ‘अमृत कलश’; जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपुर्द करणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मेरी माटी मेरा देश' (Meri Mati Mera Desh) या अभियानामध्ये राज्यभरातील २२ विद्यापीठांमधून (Universities in Maharashtra) विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (COEP) मुख्य सभागृहात २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता 'महाराष्ट्र अमृत कलश संकलन' हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार जे. पी. नड्डा (J P Nadda) आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 

महाराष्ट्रात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र, आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने हे अभियान हजारो विद्यार्थ्यांमार्फत महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावागावांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये अमृतवाटिका तयार करण्यात येत आहेत, शिलालेख लावण्यात येत आहेत. हजारो हातांनी गोळा केलेली माती प्रतिकात्मक स्वरूपात अमृत कलशामधून जमा करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालयांमधील उपक्रमातून जमा झालेले अमृतकलश प्रातिनिधिक स्वरूपात जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. येत्या काळात देशभरातून येणारे अमृत कलश दिल्लीमध्ये एकत्रित करण्यात येतील आणि त्यातून देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेली अमृतवाटिका उभी राहणार आहे.

वारे गुरूजी आता चप्पल घालणार का? आरोप झाल्यापासून फिरतात अनवाणी

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नामांकित शिक्षण संस्थांचे प्रमुख आणि राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू अमृत कलशांसह सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील २२ विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी आणलेल्या अमृतकलशांची मिरवणूक काढत सन्मानपूर्वक त्यांचे हस्तांतर करण्यात येणार आहे.

 

याशिवाय आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी हे देखील राबवलेल्या अभियानाचे अमृतकलश चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्त करतील. पुणेकर नागरिकांपर्यंत अभियान नेण्यासाठी शहर भाजपतर्फे एकाच दिवसात घरोघरी जाऊन ३८ हजार कुटुंबांकडून अमृतकलशात माती गोळा करण्यात आली होती. पुणेकरांच्या वतीने आलेला हा अमृतकलशही यावेळी सपूर्त करण्यात येईल.

राज्यभरातील २२ विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यात १ हजार ५१७ महाविद्यालयांनी ४ हजार १७६ गावांतून ३ हजार ४१४ अमृत कलश गोळा केले आहेत. तर, विविध ठिकाणी १ हजार १६४ अमृत वाटिका आणि ७८७ शिलफलक स्थापित केले आहेत. शाळा, कॉलेज, गावे, स्मारके अशा ३ हजार ३४४ ठिकाणी नागरिकांना पंचप्रण ची शपथ विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आलेली आहे. या अभियानाचा विश्वविक्रम व्हावा यासाठी 'सेल्फी विथ मेरी माटी' हा उपक्रम देखील एनएसएस द्वारे राबवला गेला. यात ५७ हजार ८८ लोकांनी आपला माती सोबतच सेल्फी आपलोड करून अभियानात भाग घेतला आहे. अजूनही यात लोकांचा सहभाग वाढतच असल्याची माहिती अभियानाचे प्रदेश संयोजक व एनएसएसचे राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी दिली.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j